वैजापूर- गंगापूर तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा : कृती आराखड्याप्रमाणे शाळांमध्ये सुविधा बळकटीकरण व दशसूत्री अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 









छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)-  जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांचे बळकटीकरण मनरेगाच्या माध्यमातून करणे तसेच गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी दशसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी दिलेल्या कृती आराखड्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज लासूर स्टेशन येथे मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत केले.

            मनरेगा मधून जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांचे बळकटीकरण करणे, तसेच दशसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करुन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम करण्यासाठी आज लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्स येथे गंगापूर व वैजापूर तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.

            उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, श्रीमती लाटकर, श्रीमती अरुणा भुमकर, प्राचार्य डाएट श्रीमती सान्वी देशमुख, गंगापूरचे तहसिलदार डॉ. नवनाथ वांगवाड, वैजापूर तहसिलदार सुनिल सावंत, गंगापूर गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, वैजापूर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण बेण्णीकर तसेच सर्व गटशिक्षण अधिकारी, शिक्षण विकास अधिकारी व मुख्याध्यापक उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, शाळांमधील सुविधांच्या विकासासाठी मनरेगातून निधीची उपलब्धता असून यासाठी करावयाची कार्यवाही ही कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे करावयाची आहे. त्याप्रमाणे मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी अंमलबजावणी करावयाची आहे. त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांना घडविणे हे अत्यंत पवित्र कार्य आहे. मुलांना देशाचे भावी नागरिक म्हणून आपण घडवित आहोत ह्या जबाबदारीचे भान असू द्यावे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी दशसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता नाही. वेगळा वेळ द्यायची गरज नाही. हा कार्यक्रम आपल्याला आपली दैनंदिन शैक्षणिक काम करीत असतांनाच करता येणार आहे. या कामातून आपल्याला चांगले काम केल्याचे समाधान मिळणार आहे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. त्यांनी दशसूत्री कार्यक्रमाचे सादरीकरण सविस्तर विवेचन केले.

            प्रास्ताविक जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले. गटशिक्षणाधिकारी समाधान आराख यांनी आभार मानले तर राजेश हिवाळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प सादरीकरण, ग्रंथप्रदर्शन ही आयोजित करण्यात आले होते. तसेच शिक्षकांच्या कलासंचाने साक्षरता या विषयावर पथनाट्य सादर केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा