कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्रःदि.२० पर्यंत सुरु राहणार शोध मोहिम

 छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)-  सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार हे ध्येय्य साध्य करण्यासाठी समाजातील  व्यक्तिंची प्रत्यक्ष शारिरीक तपासणी करुन कुष्ठरुग्ण शोध मोहिम दि.१६ ते २० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य सेवकांना तपासणी करु द्यावी व योग्य ती माहिती द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

              कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र  (कुसुम) शोध मोहीम २०२४-२५ सुरु होत असून त्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (दि.१० रोजी) बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ.शिवकुमार हालकुडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वैशाली डकले पाटील  तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक व सर्व तालुका आरोग्य अधिकारी हजर होते.

            बैठकीत माहिती देण्यात आली की, शास्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत केंद्र शासनाने शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार हे उददीष्ठ निश्चित केले आहे. त्यासाठी समाजातील नविन कुष्ठरुग्ण शोधुन त्यांना बहुविध औषधोपचाराखाली  आणणे आवश्यक आहे. दि. १६ ते २० या कालावधीत जिल्ह्यात विटभट्टी कामगार,खाण कामगार,स्थलांतरीत व्यक्ती, बांधकाम मजूर, आश्रमशाळा, वस्तीगृहात राहणारे विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी यांची प्रत्यक्ष शारीरीक तपासणी करण्यात येणार आहे. आशा कार्यकर्ती व पुरुष स्वयंसेवक यांचे मदतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

नागरिकांनी  फिक्कट लालसर बधीर चट्टा. तेलकट गुळगुळीत चमकदार त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, दुखऱ्या मज्जातंतु,  हातापायाला मुंग्या येणे व अशक्तपणा येणे इ. लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन करण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा