क्षयमुक्त अभियानःCY-TB चाचणीस आजपासून प्रारंभ; सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये होणार मोफत चाचणी
छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)- भारत सरकारच्या क्षयरोग मुक्त अभियानातील केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत सुप्त अवस्थेतील क्षयरोग संसर्गाच्या पूर्व निदानासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या मार्फत CY-TB चाचणी जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज CY-TB चाचणी करण्याची प्रातिनिधिक सुरुवात आज करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपसंचालक डॉ.कांचन वानेरे, सहाय्यक
संचालक (वैद्यकीय) आरोग्य सेवा डॉ. रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय
धानोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वैशाली डकले पाटील, जागतिक आरोग्य संघटना
सल्लागार डॉ. कौस्तुभ दासगुप्ता, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास विखे पाटील व जिल्हा
क्षयरोग केंद्र कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
क्षयरोगाचे जिवाणू शरीरात सक्रिय होण्यापुर्वी सुप्त अवस्थेतील क्षयरोगाचे
लवकर निदान केल्यास पुढील क्षयरोगाचा प्रतिबंध करता येतो. अतिजोखीमग्रस्त व
क्षयरुग्णांच्या सहवासातील नागरिकांची तपासणी करणे गरजेचे आहे.सर्व सार्वजनिक
आरोग्य संस्थेमध्ये ही चाचणी मोफत आहे. सुप्त अवस्थेतील क्षयरोगाचे जिवाणु हे
सक्रिय अवस्थेत रुपांतरीत होण्यापुर्वी ही तपासणी करण्यात येते. ही तपासणी दूषित
आढळुन आल्यास अशा रुग्णांना क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार हे सार्वजनिक आरोग्य संस्थेमार्फत
देण्यात येते. त्यामुळे नवीन क्षयरोग निदान होण्याचे प्रमाणात घट होईल.
जिल्ह्यातील क्षयरुग्णांच्या
संपर्कातील व अतिजोखमीच्या गटातील व्यक्तिंनी ही तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन
आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. ही चाचणी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण,
उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंद्र येथे
तपासणी मोफत स्वरुपात उपलब्ध आहे,असेही कळविण्यात आले आहे.
०००००


Comments
Post a Comment