शपथ ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची ;महिलांच्या बरोबरीच्या सहभागानेच होईल देशाची प्रगती- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका) – प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. मात्र एवढ्यावरच न थांबता आता प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीने व्हायला हवा, तरच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. मुलींचा घटता जन्मदर ही एक सामाजिक समस्या असून ती सोडविण्यासाठी प्रत्येकाने कटीबद्ध होणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. यावेळी उपस्थितांना बेटी बचाओ बेटी पढाओ ची शपथ देण्यात आली.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज ‘बेटी बचाओ
बेटी पढाओ’ या योजनेस १० वर्षपूर्ती झाल्यानिमित्त महिला व बालविकास विभागाच्या
वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर,
महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव, जिल्हा महिला
व बालविकास प्रकल्प अधिकारी रेश्मा चिमंद्रे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी म्हणाले की, जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर ही चिंतेची बाब आहे.
गर्भलिंग निदान तपासणी, कन्याभ्रूण हत्या, बालविवाह सारख्या सामाजिक समस्या
सोडविण्यासाठी कायदे असले तरी सर्वसामान्य लोकांपर्यंत याबाबतचे प्रबोधन, जनजागृती
पोहोचून लोकशिक्षण व्हायला हवे. हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजाचे संतुलन
साधण्यासाठी महिला व पुरुषांचे प्रमाण योग्य हवे. महिलांचा सर्व क्षेत्रात पुरुषांच्या
बरोबरीने सहभाग हवा, तरच देशाची प्रगती होईल. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या
प्रत्येक उपक्रमाचे इष्ट परिणाम दृष्टिपथास यावे. हे अभियान प्रत्येक ग्रामपंचायतस्तरापर्यंत
नेण्यात यावे,असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व
शासकीय विभागांनी प्रयत्न करावे,असे आवाहनही त्यांनी केले.
श्रीमती
सुवर्णा जाधव यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती रेश्मा चिमंद्रे यांनी उपस्थितांचे
आभार मानले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी फलकावर स्वाक्षरी करुन आपला अभियानातील
सहभाग नोंदविला.
०००००









Comments
Post a Comment