महारेशीम अभियान २०२५;वर्षभरात २.२५ मे.टन धागा निर्मिती जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)-राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी ‘महारेशीम अभियान २०२५’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रचारार्थ व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी आज एक प्रचार रथ रवाना झाला. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २.२५ मे.टन रेशीम धाग्याची निर्मिती झाली आहे. आणखी शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळावे यासाठी हा प्रचार रथ जनजागृती करणार आहे.
जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांच्या हस्ते या रथास हिरवी झेंडी दाखविण्यात आली. जिल्ह्यात १००
गावांमध्ये हा रथ जाऊन रेशीम उत्पादनाविषयी जनजागृती करणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी
विनोद खिरोळकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे, क्षेत्रिय अधिकारी
बी.बी. जायभाये आदी यावेळी उपस्थित होते.
रेशीम
उद्योग हा शेतीला पूरक उद्योग म्हणून पाहिला जातो. राज्यात पुणे, छत्रपती
संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा विभागातील २७ जिल्ह्यांमध्ये रेशीम उत्पादन घेतले जाते.तुतीची
लागवड करुन त्यावर रेशीम कोषांची जोपासना करणे हा रेशीम निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाचा
टप्पा होय. एकरी २ ते अडीच लाख रुपये इतके उत्पादन याद्वारे मिळू शकते. एकदा तुती
लागवड करुन १० ते १२ वर्ष उत्पादन घेता येते.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात सन २०२४-२५ साठी ११३५ शेतकरी निवडण्यात आले असून १२५२.५० एकर
क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे.या वर्षभरात डिसेंबर २०२४ अखेर २ लाख २० हजार
७७५ लक्ष अंडीपुंज वाटप करण्यात आले असून त्याद्वारे १५९.४७२ मे.टन कोष उत्पादन
झाले त्यापासून २.२५ मे.टन धागा निर्मिती करण्यात आली.
शासनाचे
चिकलठाणा येथे रेशीम फार्म असून तेथे अंडीपुंज निर्मिती केंद्र, निवासी शेतकरी
प्रशिक्षण केंद्र, चॉकी किटक संगोपन केंद्र व रेशीम किटक संगोपन केंद्र आहेत.
जिल्ह्यात २ रेशीम धागा निर्मितीचे खाजगी प्रकल्पांनाही मंजूरी देण्यात आली आहे. सन
२०२५ करिता जिल्ह्याला रेशीम, कृषी व जिल्हा परिषद असे मिळून ११०० एकर क्षेत्रावर तुती
लागडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रेशीम उत्पादनासाठी नोंदणी
करण्याचे कामही हा प्रचार रथ करणार असून ९ फेब्रुवारी पर्यंत हा रथ जिल्ह्यात
जनजागृती करणार आहे, अशी माहिती बी.डी. डेंगळे यांनी दिली.
०००००

Comments
Post a Comment