एपीएल शेतकरी रेशनकार्ड लाभर्थ्यांना कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):- छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागातील थेट हस्तांतरण लाभापासून वंचित असलेल्या एपीएल (शेतकरी) रेशनकार्ड धारकांनी आपले कागदपत्रे पुरवठा विभाग तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) येथे दि.१५ पर्यंत जमा करण्याचे आवाहन तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी केले आहे.

            तालुक्यातील एपीएल शेतकरी लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना प्रती व्यक्ती १७० रुपये प्रतीमाह प्रमाणे सुरु करण्यात आली असून त्याअनुषंगाने शासन निर्देशानुसार वेळोवेळी  एपीएल शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना एपीएल डिबीटी योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याबाबत सर्व रास्तभाव दुकानदारांमार्फत सुचित करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकूण ५२३४ एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांपैकी १४३६ शिधापत्रिकाधारकांना आजपर्यंत थेट लाभ मिळालेला असून, आज ही तालुक्यातील ३७९८ शिधापत्रिकाधारक हे थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेपासून वंचित आहेत.

            एपीएल डिबीटी कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित रास्तभाव दुकानदार तसेच ग्राम महसूल अधिकारी यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार एपीएल डिबीटी लाभापासून वंचित असणाऱ्या एपीएल शेतकरी लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक कागदपत्रे (७/१२ छायांकित प्रत, सर्व सदस्यांचे आधार कार्ड छायांकीत प्रत, महिला सदस्यांचे बँक खाते इ.) संकलित करुन तहसिल कार्यालय पुरवठा विभाग येथे दि.१५ जानेवारी पर्यंत जमा करावयाचे आहे. त्यानंतर  ज्या शिधापत्रिकाधारकांचे अर्ज जमा होणार नाही त्यांना योजनेतून वगळण्यात येईल. थेट रोख रक्क्म हस्तांतरण योजनेचा लाभ न मिळाल्यास स्वत: लाभार्थी यास जबाबदार राहतील असे तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा