दशसुत्रीची फलश्रुती; गदाना येथील विद्यार्थिनीच्या तोंडुन शिवरायांची थोरवी ऐकून भारावले जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शाळकरी मुलामुलींची गुणवत्ता वाढावी यासाठी दशसुत्री राबविण्यात येत आहे. दशसुत्रीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर देण्यात येत आहे. त्याचीच प्रचिती आज खुद्द जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना आली. गदाना ता. खुलताबाद येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इयत्ता ६ वी ची प्राची अंकुश ठेंगडे या विद्यार्थिनीने छत्रपती शिवरायांची थोरवी उत्स्फूर्तपणे जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सांगितली. आणि जिल्हाधिकारी स्वामी तिच्या वक्तृत्वाने भारावले. त्यांनी समाधानाने तिला बक्षीस दिले. जिल्हा परिषद केंद्र शाळा गदानाचा इयत्ता ६ वी चा वर्ग टाळ्यांच्या कडकडाटाने आणि मुलांच्या आनंदाने भरुन गेला.
आज
जिल्हाधिकारी स्वामी हे कन्नड, वेरुळ दौऱ्यावर होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास
ते अचानक पाहणी करण्यासाठी गदाना या गावात गेले. तेथे जिल्हा परिषद केंद्र शाळेवर
गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट इयत्ता ६ वी च्या वर्गाला भेट दिली. तेथील शिक्षिका
अर्चना अधाने ह्यांचा चित्रकलेचा तास सुरु होता. विद्यार्थ्यांना छत्रपती
शिवरायांचे चित्र रंगविण्यासाठी देण्यात आले होते. मुले रंगकामात गर्क होती. जिल्हाधिकारीही
मुलांचे रंगकाम पाहत होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी मुलांना विचारले की, चित्र
रंगवताय पण छत्रपती शिवरायांची थोरवी, त्यांचा पराक्रम याबद्दल कुणाला माहिती आहे
का? त्यावर प्राची या मुलीने उठून सांगितले की तिने याविषयावर निबंध लिहिला आहे.
तो सांग असे म्हणताच प्राचीने आपल्या खडखडीत आवाजात जिल्हाधिकाऱ्यांसमोर छत्रपती
शिवरायांची महती सांगितली. तिच्या त्या ३ ते ४ मिनिटाच्या वक्तृत्वाने जिल्हाधिकारी
स्वतः भारावले.
मुख्याध्यापक
शेख नदीम यांनी या शाळेत दशसुत्रीनुसार मुलांना विविध उपक्रमात सहभागी करुन
त्यांच्यातील कलागुणांना, व्यक्तिमत्व विकासाला वाव दिला जात असल्याचे सांगितले.
प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यातील कौशल्य हेरुन त्याला वाव देण्याचे काम शिक्षक
करीत आहे. त्याचीच एक चुणूक प्राचीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी स्वामी यांना
दिसली. जिल्हाधिकाऱ्यांनी या विद्यार्थिनीला स्वतःकडून वैयक्तिक रोख रकमेचे बक्षीस
दिले. आपल्या वर्गातील मैत्रीणीचा जिल्हाधिकारी स्वतः गौरव करतात हे पाहुन मुलांना
खूप आनंद झाला. तो त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करुन व्यक्त केला. उपविभागीय अधिकारी
संतोष गोरड व अन्य अधिकारी- कर्मचारी, तसेच शाळेचे शिक्षक यावेळी उपस्थित होते.
०००००




Comments
Post a Comment