ग्रंथोत्सव परिसंवादः भाषेचा विकास ही निरंतर प्रक्रिया- डॉ.मिलिंद दुसाने

 





छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- भाषेची निर्मिती ही उत्पादन  प्रक्रियेशी संबंधित आहे. जोपर्यंत उत्पादन आणि त्याद्वारे जीवन जगण्याचा प्रवाह सुरु आहे तोवर भाषानिर्मिती होत राहणार. भाषेचा विकास ही निरंतर प्रक्रिया असून या भाषांवर आधारीत ज्ञानव्यवहाराची महत्त्वाची केंद्रे म्हणून ग्रंथालयांना विशेष महत्त्व आहे,असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी आज ग्रंथोत्सवातील परिसंवादात केले.

ग्रंथोत्सवाच्या दुपारच्या सत्रात ‘मराठी भाषेच्या विकासात ग्रंथालयाचे योगदान’ याविषयावर परिसंवाद आयोजीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने हे होते. तर डॉ.रा.श बालेकर, अनिल लहाने, गुलाबराव मगर, कुंडलिक कतकरे  यांनी सहभाग घेतला. परिसंवादात डॉ.बालेकर यांनी ग्रंथालयांची आवश्यकता व त्याद्वारे लोकांना मिळणारी सेवा याबाबत माहिती दिली. तर अनिल लहाने यांनी वाचन संस्कृतीत ग्रंथालयांचे महत्त्व व त्याद्वारे भाषाविकासाची प्रक्रिया विषद केली. कुंडलिक कतकरे यांनी साहित्य निर्मिती व त्या साहित्याचा प्रसार करण्यात ग्रंथालयांची भुमिका मांडली. गुलाबराव मगर यांनी ग्रंथालयांचा विकास, त्यांच्या व्यवस्थापनातील अडचणी यावर प्रकाश टाकला.

डॉ. दुसाने म्हणाले की, ज्यावेळी समाजातील काही घटकांना लिहिणे वाचण्यास प्रतिबंध करणारी कुप्रथा होती. त्यावेळेसही ह्या घटकांनी आपल्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेत भाषा विकसित करीतच होते. अनेक घटकांच्या दैनंदिन व्यवहारातील वेगवेगळे शब्द आपणास माहिती नसतात. कारण त्यांचे जीवन आपणास माहिती नाही. ह्याच वर्गातील लोक शिकले, लिहू लागले त्यांनीही साहित्य निर्मिती केली आणि नंतर त्यांचे शब्द मराठी भाषेत आले आणि मग आपली भाषासमृद्ध झाली. ही प्रक्रिया निरंतर सुरुच असते. ही भाषा विविध साहित्याच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविणारे ग्रंथालये व त्यातील ग्रंथपाल हे या प्रक्रियेतील महत्त्वाचे दुवा होत,असेही डॉ. दुसाने यांनी सांगितले.

सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.

आज(दि.२२)भरगच्च कार्यक्रम व समारोप

      ग्रंथोत्सवात  शनिवार दि.२२ रोजी  सकाळी ११ वा. ‘भारतीय संविधान – हक्क आणि कर्तव्य’ या विषयावरील परिसंवाद कार्यक्रमात  अध्यक्षस्थानी डॉ.जयदेव डोळे असणार आहे. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ.ह.नि. सोनकांबळे, ॲङ बाबा सरदार उपस्थित राहणार आहे. दुपारी २ वा. कथाकथन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी  उत्तम बावस्कर सहभाग गेनू शिंदे, सरदार जाधव, श्रीमती ज्योती सोनवणे असणार आहे. दुपारी ४ वा. समारोप समारंभास प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ संपादक प्रविण बर्दापुरकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, हास्य कवी डॉ. विष्णू सुरासे, जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष सुभाष सोळंके उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास ग्रंथप्रेमी, वाचकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव - २०२४ समन्वय समितीचे अध्यक्ष सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, सदस्य शिक्षणधिकारी (माध्य) श्रीमती अश्विनी लाटकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, कार्यवाह मराठवाडा साहित्य परिषद डॉ.दादा गोरे, प्रकाशक संघटना कुंडलिक अतकरे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष सुभाष सोळंके, सदस्य सचिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष धो. साबळे, संयोजन सदस्य ज्ञानेश्वर पैठणे, दीपक काळे, संजीव ठाकूर, श्रीमती उज्वला नाटकर आदींनी केले आहे.

  ०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा