जिल्हा कार्यकारी समितीची बैठक: कैद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करा-जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- कारागृहातील कैद्यांना बंदिवासात कौशल्य प्रशिक्षण दिल्यास त्यांचे पुढील आयुष्यात पुनर्वसन करणे अधिक सुकर होईल. त्याकरीता जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
कौशल्य,
रोजगार, उद्योजकता नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी
कार्यालयात पार पडली. जिल्हा कौशल्य विकास आराखड्या संदर्भात या बैठकीत चर्चा
झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सहाय्यक आयुक्त सुरेश
वराडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, उद्योग निरीक्षक ए.एस. जरारे, कृषी
विज्ञान केंद्राच्या डॉ.अनिता जिंतुरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक
पी.बी. दुर्गे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा समन्वयक सुचिता खोतकर, अटल
इंक्युबेशन सेंटरचे संचालक वैभव खैरनार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे
प्राचार्य अभिजीत अल्टे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीवास्तव,
तंत्रनिकेतन विद्यालयाचे खराळ, सीपेट प्रशिक्षण संस्थेच्या मौसम चौधरी, नेहरू युवा
केंद्राचे जिल्हा समन्वयक संकल्प शुक्ला आदी उपस्थित होते.
जिल्हा
कौशल्य विकास आराखड्यात कारागृहातील कैदी व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी कौशल्य
विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. त्यात कारागृहातील कैद्यांना
विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामुळे
कैद्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात. प्रशिक्षणामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक मानसिक
बदल घडवून आणण्यास मदत होईल. तुरुंगवासानंतर समाजात मुख्य प्रवाहात सामील होण्याची
संधी मिळेल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दिव्यांग
व्यक्तींसाठी देखील कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांना
रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, अशी भुमिका जिल्हाधिकारी
स्वामी यांनी मांडली. त्यानुसार कौशल्य व उद्योजकता विकास विभागाने प्रस्ताव सादर करावा,असे
निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात
यावा. दि.१ मे रोजी जिल्हा कारागृहात कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू होईल असे नियोजन
करावे. जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमात या उपक्रमाचा समावेश करावा.अधिक सकारात्मकतेने
योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. जिल्ह्यातील विविध संस्था
आणि विभागांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे.
०००००




Comments
Post a Comment