आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा ;जिल्ह्यातील ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष

 


छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका):- जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून, कमाल तापमान ४० अंशावर जात आहे, तसेच पुढील तीन महिने तापमानाचा पारा वाढणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या आजारांवर उपचारासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी जिल्ह्यातील सर्व ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करून तेथे पुरेसा औषधसाठाही ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. तसेच त्यामुळे मृत्यू होणेही संभव असते. त्यातच आतापासूनच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढत चालले आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशावर जात आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांना जागरुक करण्यासाठी खालील माहिती देण्यात आली आहे.

उष्माघाताची लक्षणे

१. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढल्यास त्याला उष्माघात म्हणतात.

२. मळमळ, उलटी, ताप, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी या तक्रारी  

  सुरू होतात.

३. मनाची स्थिती बिघडते, व्यक्ती असंबंध बडबड करते, चिडचिड करते. जीभ जड होते, जास्त घाम

   येतो, पायात गोळे येतात.

४. पोटऱ्यात वेदना किंवा पेटके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था.

उष्माघाताची कारणे

उन्हाळ्यात शेतात किंवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये तसेच काच कारखान्यात काम, अधिक तापमानाच्या खोलीत काम, घट्ट कपड्याचा वापर.

प्रतिबंधात्मक उपाय

 दर तासाला १ ते दीड ग्लास पाणी प्यावे. लिंबू सरबत, शहाळे, फळांचा ताजा रस, पन्हे, कोकम सरबत, ताक, लस्सी असे द्रवपदार्थ घ्यावेत. आराम करावा, सैलसर, फिक्कट रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हाळ्याची चाहूल लागली की वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे टाळणे.  कष्टाची कामे सकाळी किंवा सायंकाळी कमी तापमानात करणे, जलसंजीवनीचा वापर, भरपूर पाणी प्यावे, सरबत प्यावे, उन्हामधील काम अधूनमधून थांबवावे, सावलीत विश्रांती घ्यावी, उन्हात बाहेर जाताना काळ्या काचेचा चष्मा, डोक्यास उन लागू नये म्हणून टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा. गरज नसेल तर उन्हात बाहेर फिरू नये. जर बाहेर जावे लागलेच तर उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी.

प्राथमिक उपचार

 उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास प्रथम भरपूर पाणी प्यावे. उन्हातून आल्यानंतर थोडावेळ बसा आणि नंतर ग्लासमध्ये पाणी ओतून प्या, खूप थंड, बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये, रुग्णास वातानुकूलित किंवा मोकळ्या हवेशीर खोलीत ठेवणे. खोलीत पंखे, कुलर असावेत. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, आइस पॅक लावणे, आवश्यकतेनुसार सलाइन देणे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आरोग्य विभागाची सज्जता

उष्माघात रुग्णास सलाईन द्वारे औषधी मात्र देण्यात येऊन प्राथमिक स्तरावरील उपचार करण्यात येतात. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उष्णतेची निगडित आजारांचा धोका वाढण्याची  शक्यता आहे. आणि उष्माघाताच्या रुग्णसंखेत वाढ होऊ नये यासाठी उष्माघात प्रतिबंध उपाय योजना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक खाट उष्माघात रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आली असून, उष्माघात कक्षामध्ये हवा खेळती राहील, खिडक्या व दरवाजे मोकळे असतील, कक्षामध्ये कुलर, पंखा एसी इ. पैकी २४ तास चालू स्थितीत उपलब्ध राहील, पुरेसे पिण्याचे थंड पाणी उपलब्ध राहील, तापमान नियंत्रण आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून दिली जावी, ORS द्रावण पाकीट उपलब्ध असावे, आईस पॅक उपलब्ध असतील, उष्माघात कक्षा बद्दलची माहिती संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ निर्देशित करण्यात येईल, उष्माघात कक्षा हा २४ तास कार्यरत ठेवण्यात येईल.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास वैद्यकीय सल्ल्यासाठी किंवा निदानासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा. लहान मुले, ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा