जि.प.उपकरातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत देण्याची योजना
छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- जिल्हा परिषद उपकर २० टक्के योजनेंतर्गत सर्व मागासप्रवर्गातील (एस.सी., एस.टी., व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी.) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा,असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत जिल्हा
परिषदेच्या उपकरातून सर्व मागासप्रवर्गातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना
शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती केली जाते. ही योजना
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबास लागू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीस्तरावर
विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचा पाल्य हा सन २०२४-२५ व २०२५-२६ या
वर्षात शिक्षण घेत असावा.
योजनेअंतर्गत मिळणारा लाभ-इयत्ता १ ली ते ५ वी- ५ हजार रुपये,
इयत्ता ६ वी ते १० वी- १० हजार रुपये, इयत्ता ११ वी ते १२ वी ५० हजार रुपये,
व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम (वैद्यकीय व अभियांत्रिकी) १ लाख रुपये, बिगर
व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम ५० हजार रुपये. व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम
(वैद्यकीय व अभियांत्रिकी) ६० हजार रुपये. बिगर व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम ३०
हजार रुपये. याप्रमाणे.
योजनेच्या अटी व शर्ती:
विद्यार्थी हा शेतकऱ्याचा पाल्य व अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध घटाकातील
असावा. विद्यार्थी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा रहिवासी असावा. कुटुंबातील सदस्य
शासकीय, निमशासकीय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला द्यावा लागेल. विद्यार्थ्याने
अर्जासोबत पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स जोडलेली असावी. विद्यार्थ्याचे पालकाचे
सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र सादर करणे बंधन कारक राहील.विद्यार्थ्याच्या
पालकाचे नाव जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या यादीत
समाविष्ट असावे. विद्यार्थ्याने योजनेसाठी शाळा, महाविद्यालय येथील बोनाफाईड
प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी शाळा,
महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा, असे छत्रपती संभाजीनगर जिल्हा
परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment