महसूल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण: अद्यावत ज्ञान घ्या आणि जनकल्याण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)-जनकल्याणाचे काम करतांना अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अहंकार बाजूला ठेवून प्रशिक्षणाद्वारे दिले जाणारे अद्यावत ज्ञान घ्यावे व पारदर्शकतेने जनतेच्या अडचणी सोडवाव्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवस कार्यलयीन
कामकाज सुधारणा कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपविभागीय
अधिकारी पैठण-फुलंब्री अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी जमिन विषयक कायद्याचे प्रशिक्षण आज
घेण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात हे आयोजन करण्यात आले. पैठण उपविभागीय अधिकारी
नीलम बाफना, पैठण तहसीलदार दिनेश झांबरे, निवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर,
नायब तहसीलदार तलाठी, महसूल सहाय्यक प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, प्रशासनात
काम करत असताना वेळोवेळी कायद्यांमध्ये सुधारणा होत असतात. त्यासाठी कायद्याचे अद्यावत
ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अधिकारी कर्मचारी यांनी जमीन महसूल विषयक कायदे जाणून घेणे आवश्यक आहे.संवाद समुपदेशनाच्या
माध्यमातूनही आपण अनेक जटील प्रश्न सोडवू शकतात.
त्याद्वारे नागरिकांच्या अडचणींचे निराकरण आपण करु शकता. त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता
असते. प्रशिक्षणामुळे अद्यावतता,पारदर्शकता व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करता येतो.
त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अहंकार भाव न ठेवता प्रशिक्षण घ्यावे व सर्वसामान्य
नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्या.
प्रास्ताविक उपविभागीय
अधिकारी नीलम बाफना यांनी केले तर निवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी
साधन व्यक्ती म्हणून उपस्थितांना प्रशिक्षण
दिले.
०००००




Comments
Post a Comment