मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक; आपत्ती निवारणासाठी सज्ज रहा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






      छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका):- महानगरपालिका,नगरपालिका,तालुका ते गावपातळीपर्यंत पावसाळापूर्व उपाययोजनांची कामे येत्या १ जूनपर्यंत पूर्ण करावीत. संपर्क व समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व यंत्रणांना दिले.

            जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या सह अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, आपती निवारण कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, अपर आयुक्त मनपा रणजीत पाटील, डेप्युटी ब्रिगेडीयर कमांडंट ऋषिकेश सुर्यवंशी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के तसेच सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

            बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात गोदावरी नदी काठावर निळ्या रेषेखाली येणारी पैठण तालुक्यात १८ तर वैजापूर तालुक्यात १७ व गंगापूर तालुक्यात ८ अशी एकूण ४३ गावे आहेत. पैठण तालुक्यात पैठण शहर, कावसान, दादेगाव- जहांगीर, नायगाव, वडवळी, नवगाव  व वैजापूर तालुक्यातील डोणगाव, बाबतारा, लाखगंगा, नांदूरढोक, बाभूळगाव, बाजाठाण या गावांना पुरामुळे वेढा पडतो. तर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १६, पैठण तालुक्यात १५,  फुलंब्री तालुक्यात ७, वैजापूर तालुक्यात ३१, गंगापूर तालुक्यात २६, खुलताबाद तालुक्यात ६, सिल्लोड तालुक्यात १०, कन्नड तालुक्यात ४८ तर सोयगाव तालुक्यात ६ अशी एकूण १६५ गावे ही पूरप्रवण आहेत. जिल्ह्यात कायगाव ता. ग्गापूर येथे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता  व पैठण येथून शेवगाव कडे जाणारा रस्ता असे गोदावरी नदीवरील पुल पुराने बाधीत होतात.

            आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्यात मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे ५ बोटी, १९५ लाईफ जॅकेट्स, १६० लाईफ बॉय, २१५ बचाव साहित्य किट, ८१५ फोल्डींगचे स्ट्रेचर,८१५ बॉडी कव्हर बॅग्ज, १३२ सेफी हेल्मेट्स, १० रेस्क्यू क्राफ्ट्स, आपात्कालिन प्रकाश योजनेचे १७ संच, २७६ गम बुट जोडे, तात्पुरते उभारावयाचे २० तंबू, ५ दुर्बिणी असे साहित्य असून जिल्ह्यात ७९ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात आली आहे.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांमध्ये पावसाळ्याच्या आधी जी आपत्ती व्यवस्थापनाची कामे करावयाची असतात त्यात शहरांमध्ये  नाल्यांची सफाईची कामे, विद्युत जोडण्या व संयंत्रांची देखभाल, पूरनियंत्रणासाठी करावयाची कामे  दि.१ जूनच्या आत पूर्ण करावी. पुराचा धोका संभावणारी गावे, किंवा पुराच्या पाण्याने वेढली जाणारी गावांमध्ये जलशुद्धीकरणाची औषधी, साथरोगाची औषधे, अत्यावश्यक अन्नधान्य साठा इ. ची व्यवस्था करुन ठेवावी. तसेच जिल्ह्यातील पुलांचे, धरणांच्या बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती करुन घ्यावी.  पैठणकडे जाणारा रस्ता व त्या रस्त्याच्या लगत होणारे पाईपलाईनचे काम  करतांना सुरक्षा उपाययोजनांबाबत खबरदारी घेण्यात यावी. तसेच जिल्ह्याची सर्व विभागांची संपर्क व समन्वय व्यवस्था तयार करावी. दि.१ जून पर्यंत प्रत्येक २४x७ नियंत्रण कक्ष तयार करुन कार्यान्वित करावा. सर्व ग्रामपातळीवरील अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनीही आपापल्या घरांच्या डागडुजीची, दुरुस्तीची किरकोळ कामे पावसाळ्याच्या अनुषंगाने करुन घ्यावीत,असे आवाहनही त्यांनी केले.

            जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी माहितीचे सादरीकरण केले तर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी आभार मानले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा