जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी अद्यावत कौशल्य प्रशिक्षण- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका)- जिल्ह्यात नजिकच्या काळात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. या औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशा अद्यावत कौशल्य प्रशिक्षणासाठी विभाग सज्ज व तत्पर आहे,असे प्रतिपादन कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आढावा बैठकीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कौशल्य,
उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध योजनांचा आढावा बैठकीचे आयोजन
करण्यात आले होते. बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष
नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सहसंचालक,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक
कार्यालय पुरुषोत्तम देवतळे, उपायुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग श्रीमती
विद्या शितोळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजीत आलटे, उपसंचालक देवगिरी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रदीप दुर्गे आदी या बैठकीस उपस्थित होते.
जनसंवाद कार्यक्रमांतर्गत मंगलप्रभात
लोढा मंत्री यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील इमारत, अभ्यासक्रम, अधिकारी
व कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी, विकास विषयक निधीचे विविध विषय, नवीन अभ्यासक्रमाची
रचना,मागणी आणि त्या संदर्भात असलेल्या विविध सूचनांचा आढावा या कार्यक्रमांतर्गत घेतला. कौशल्य विकास व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत असणाऱ्या
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, सेवा विषयक बाबी, विनंती बदल्या या संदर्भातही येथे
अधिकाऱ्याने जनसंवाद कार्यक्रमात आपल्या सूचना मांडल्या. यावर मंत्री लोढा यांनी संबंधित
विषयाचे प्रस्ताव, मागणीपत्र व सेवा विषयक बाबी असणाऱ्या गोष्टीचे कागदपत्र सादर करण्याचे
निर्देश या कार्यक्रमात दिले.
यामध्ये मनोज वाघमारे ,तृप्ती भोपे, प्रशांत
जोगदंड ,प्रशांत पाटील, शेख सोहेल ,अभिजीत कावले यांनी आपल्या विविध मागण्या जनसंवाद
कार्यक्रमात मांडले. यावर शासकीय आणि प्रशासकीय बाबींचा विचार करून योग्य ते तोडगा
काढण्याचा व उपाययोजनात्मक निर्णय देण्याबाबत मंत्री लोढा यांनी ग्वाही दिली.
पंडित दीनदयाल उपाध्याय हीरक महोत्सव समितीची
बैठक
जिल्ह्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय
हीरक महोत्सव वर्षानिमित्त जिल्हा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अंतर्गत
विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळा महाविद्यालय, तंत्रनिकेतन कौशल्य विकास संस्था, सामाजिक संस्था, बचत गट यांच्या माध्यमातून
केले जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षण, लघुपट निर्मिती, वादविवाद स्पर्धा, शेतकऱ्यांपर्यंत
नवीन तंत्रज्ञान व रोजगाराच्या संधी पोहोचवणे व पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म
मानवता ही संकल्पना पोहोचवून विकास कार्यामध्ये किमान ३५ टक्के लोकांचा सहभाग घेतला
जाणार आहे. गावागावांमध्ये रोजगाराची संधी
उपलब्ध व्हावी, यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय हीरक महोत्सव समितीच्या माध्यमातून कार्य
होईल असे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
कौशल्य विकास विभागाची आढावा बैठक
केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा नियोजन
समितीच्या अंतर्गत निधीचे योग्य नियोजन करावे.
तसेच शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीचा उपयोग करून जिल्हात रोजगार निर्मितीला चालना द्यावी. त्यासाठी राबवावयाचे
उपक्रम डिसेंबर अखेर पूर्ण करावे, असे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले. या बैठकीत वर्षभरात रोजगार मेळावे आयोजीत करावे.एका तालुक्यात किमान
दोन रोजगार मेळावे आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये एक रोजगार मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रम
आयोजीत करावा असे निर्देश मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.
संस्था व्यवस्थापन समितीचा आढावा
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात असलेल्या विविध शासकीय
तंत्रनिकेतन अंतर्गत असलेल्या तालुकास्तरीय संस्था व्यवस्थापन समितीचा आढावा श्री.
लोढा यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला. संस्था समितीच्या सदस्यांनी किमान एखादा तरी
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावा. शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार,
समन्वय, पायाभूत सुविधांची उपलब्धता करावी. विद्यार्थ्यांना विविध विषयावरील मार्गदर्शन,कौशल्य
विकासाच्या अनुषंगाने असणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाचे नियोजन करावे. उद्योगांसाठी मनुष्यबळ
उपलब्धतेसाठी शासकीय तंत्रनिकेतन, कौशल्यविकास व उद्योजकता विभाग, विविध शासकीय विभाग
यांच्याशी समन्वय ठेवावा. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या
माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या
संस्थांमध्येही समन्वय ठेवावा असे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले.यावेळी जिल्ह्यातील
सर्व तालुक्यातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय व महाविद्यालयाच्या अंतर्गत कार्यरत
असणाऱ्या संस्था व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित
होते.
०००००








Comments
Post a Comment