मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील 'वाचन कट्ट्या'ला भेट अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचे केले कौतुक

 





       छत्रपती संभाजीनगर,दि.25 (जिमाका) -  मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या 'वाचन कट्टा' या अभिनव संकल्पनेला आज मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी भेट दिली.

            कुलकर्णी यांनी यावेळी वाचन कट्ट्यातील विविध पुस्तकांचे बारकाईने अवलोकन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे वाचक, अभ्यासक आणि कर्मचारी या वाचन कट्ट्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. उपलब्ध असलेल्या पुस्तकांमुळे येथे येणाऱ्यांना वाचनाची आणि ज्ञानाची नवी संधी मिळत आहे.

            यावेळी बोलताना सचिव कुलकर्णी म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारचा वाचन कट्टा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद आहे. भविष्यात इतर जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्येही अशीच वाचन कट्ट्याची संकल्पना राबवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे अभिनंदन केले.

            यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वाचन संस्कृती वाढीस लावण्यासाठी हा वाचन कट्टा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला. वाचन कट्टा येथे येणाऱ्या वाचक यांची नोंद घेतली जात  आहे.याचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागत यांना होत आहे. वाचन कट्टा यामुळे वाचन संस्कृतीला आणि मराठी भाषेच्या प्रसारासाठी तसेच दैनंदिन व्यवहारात व्यवहार भाषा म्हणून मराठीचा वापर करण्यामध्ये होईल असा विश्वास मराठी भाषेची विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा