घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’ ; नागरिकांना सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे डिजीटल पाऊल

 



छत्रपती संभाजीनगर,दि.१(जिमाका)- नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, सेवा शासनामार्फत घ्याव्या लागतात. ह्या सेवा आता नागरिकांना  घरबसल्या मोबाईल ॲपद्वारे दिल्या जाणार आहेत. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ‘सेवादूत’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे. आज हे ॲप जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते लोकांच्या सेवेत रुजू करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज हे मोबाईल ॲप रुजू करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर आदी यावेळी उपस्थित होते.

शरद दिवेकर यांनी सांगितले की, सेवादूत हे ॲप जिल्हा प्रशासनाने तयार केले आहे. याॲपद्वारे महाऑनलाईन मार्फत दिल्या जाणाऱ्या ८५८ सेवा देता येतील, अशी याची रचना आहे. प्लेस्टोअरवर जाऊन नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करावे. तेथे बुक अपॉईंटमेंट करुन आपली नोंदणी करावी. ही नोंदणी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांकासह करता येईल. त्यानंतर ते आपल्याला हव्या त्या सेवेचा तपशिल दिल्यानंतर ही माहिती जिल्ह्याच्या डेटासेंटरकडे पाठविली जाईल. तेथून ती माहिती नागरिकांच्या नजिकच्या सेवा केंद्राकडे अग्रेषित केली जाईल. संबंधित सेवाकेंद्र चालक हे त्या नागरिकाच्या घरी जाऊन त्यांना हव्या असलेल्या सेवेसाठी आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष पाहून स्कॅन करुन अपलोड करेल व त्यानंतर विहित कालावधीत संबंधित नागरिकास सेवा घरपोच दिली जाईल. या सेवेसाठी नागरिकांना १०० रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहे. ही सेवा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, अथवा आजारी नागरिकांना अधिक उपयुक्त ठरेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना अधिकाधिक सेवा डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून आणखीन काही सुविधा नागरिकांना देण्यात येतील. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा