समाज कल्याण अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 








  मुंबई, दि. 21 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत राज्याच्या विकासात आपले योगदान महत्वाचे ठरेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट–ब) पदावर निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांना प्रथम नियुक्तीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

   या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टी चे महासंचालक सुनील वारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते. समाजातील सर्व घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत आपण सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. आपण सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकाच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे कार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, शासकीय सेवेत आल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. जनतेप्रती प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याचे कार्य आपल्या हातून होणार आहे. कुणाचे तरी भले करण्याची क्षमता आपल्यात निर्माण झाली असल्याने त्याचा आपण पुरेपूर उपयोग करावा. समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची संधी आपणास शासकीय सेवेमुळे मिळाली आहे.  या संधीचे आपण सोने करावे, असे आवाहनही मंत्री श्री शिरसाट यांनी यावेळी केले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा