माजी सैनिक,पत्नी,विधवा व पाल्य यांचा विशेष गौरव; दि.२० सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, विधवा पाल्य यांना सैनिक कल्याण विभागामार्फत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे दि.२० सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्कार विजेते यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळणारे, संगणक क्षेत्रात, अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, पत्नी, विधवा, पाल्य यांना अशा कार्याबद्दल पुरस्कार दिला जातो.

पुरस्काराचे स्वरुपः- राष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी २५ हजार रुपये, आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी ५० हजार रुपये, इयत्ता १० वी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत ९० % व त्यापेक्षा जास्त, १२ वी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत ८५%  व त्यापेक्षा जास्त असल्यास २० हजार रुपये, पदवी किंवा पदव्यूत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापीठात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यास २५ हजार रुपये, IIT,IIM,AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या पाल्यांसाठी १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

विशेष गौरव पुरस्कारासाठीचे जिल्ह्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे दि.२० सप्टेंबर सायं. ४ वाजेपर्यंत जमा करावेत. तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथील ०२४०-२३७०३१३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा