‘मिल्क ते सिल्क’ उत्पादन वाढीच्या उपाययोजना राबवा- जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)-शेतीतील अशाश्वतता व जिल्ह्याची गरज पाहता आपल्या जिल्ह्यात दुध व रेशीम उत्पादनास चांगला वाव आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ‘मिल्क टू सिल्क’ या व्यवसायांकडे वळविण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. तसेच जिल्ह्यात नैसर्गिक, सेंद्रीय शेती खालील क्षेत्र वाढविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘आत्मा’ नियामक मंडळाची
आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सह संचालक सुनिल वानखेडे, जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ.
नानासाहेब कदम, प्रभारी आत्मा प्रकल्प संचालक डॉ. पडीले तसेच अन्य सदस्य उपस्थित
होते.
बैठकीत जिल्ह्यात कृषी विस्तार
सुधारणा सहाय्य कार्यक्रमासाठी सन २०२५-२६ साठी २ कोटी ३६ लाख ४७ हजार रुपयांच्या
आराखड्यास मान्यता देण्यात आली.तसेच जिल्ह्यात १५ ठिकाणी ग्रामस्तरीय माती परिक्षण
प्रयोगशाळा स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली.
जिल्हाधिकारी स्वामी
म्हणाले की, जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमी
आहे. शिवाय रेशीम उत्पादनही कमी आहे. हे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पुरक
व्यवसाय म्हणुन या व्यवसायांना चालना देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. विस्तार
कार्यात याबाबींचा समावेश करावा. तसेच जिल्ह्यात नैसर्गिक, सेंद्रीय शेती खालील
क्षेत्रातही वाढ होईल यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार
करावा,असे निर्देश श्री. स्वामी यांनी दिले.
०००००



Comments
Post a Comment