तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त वंदे मातरम सभागृहात दि.२७ व २८ रोजी राष्ट्रीय परिषद

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका)- प्रख्यात तत्त्वज्ञ, समाजसुधारक, ज्ञानकोशकार आणि भारतीय प्रबोधनाचे अग्रणी विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती वर्षाचे औचित्य साधून, त्यांच्या कार्याला व विचारांना उजाळा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 'भारतीय प्रबोधन आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी' या विषयावर आधारित ही परिषद शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या वंदे मातरम सभागृहात दि. २७ व २८ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.

            या राष्ट्रीय परिषदेचे संयुक्त आयोजन शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील इतिहास विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, भारतीय तत्त्वज्ञान अनुसंधान परिषद (ICPR), नवी दिल्ली, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान, वाई (सातारा) आणि प्रागतिक इतिहास संस्था- महाराष्ट्र यांनी केले आहे. तर्कतीर्थांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या ज्ञानसाधनेला आदराने व चिकित्सकपणे समजून घेण्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

            परिषदेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

या परिषदेचे बीजभाषण सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. नीरज हातेकर करणार असून, ‘भारतीय प्रबोधनाचा पेच व तर्कतीर्थ’ या विषयावर डॉ. शरद बाविस्कर, ‘तर्कतीर्थांची हिंदु धर्ममीमांसा’ याविषयावर डॉ. उमेश बगाडे, ‘सर्वधर्ममीमांसा’ या विषयावर डॉ. राहुल कोसंबी ‘तर्कतीर्थांच्या लिखाणातील लिंगभाव व समानतेचा लढा’ या विषयावर डॉ. निर्मला जाधव आणि आरती कड असे मान्यवर वक्ते परिषदेत अपले विचार मांडतील.

या परिषदेचा समारोप जेष्ठ अभ्यासक व तर्कतीर्थांच्या साहित्याचे संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या भाषणाने होईल.

या परिषदेत प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि जिज्ञासू नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवल थोरात यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा