‘अमृत कौशल्य उद्यम वर्धन’ प्रशिक्षण कार्यक्रम; लघु उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका)- व्यवसाय वृद्धीसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण व डिजिटल बाजारपेठेचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत कौशल्य उद्यम वर्धन – लघु उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवउद्योजकांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष व व्यवहार्य मार्गदर्शन दिले जाणार आहे.

‘कौशल्यातून उद्योग आणि उद्योगातून स्वावलंबन’ या संकल्पनेवर आधारित या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योग सुरू करण्यापासून ते उत्पादन विक्रीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगण्यात येणार आहे. उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल, ब्रँडिंग, ट्रेडमार्क नोंदणी, आर्थिक नियोजन, नफा–तोट्याचे गणित, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यायचा यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अमृत पेठ’ या विक्री माध्यमाची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, या माध्यमातून लघु उद्योगातील उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील उद्योजकांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

अमृतच्या विविध योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घेता येणार असून, ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू,राजपूत, काणबी, कम्मा, भूमीहार, हिंदू नेपाळी, समाजघटकांतील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले नागरिक या प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहेत.

स्वतःचा उद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय लंबे – जिल्हा व्यवस्थापक, अमृत- ७३९१०६५४७५

योगेश भास्करराव रोडे – जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत- ९४०३२००६०६

पत्ता:- विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर .पि.को  :४३१००९

०००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा