माध्यमिक; उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दक्षता समिती बैठक कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका)- माध्यमिक (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) शालांत परीक्षा
घेण्यासाठी सर्व सज्जता झाली आहे. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने जय्यत
तयारी केली आहे. जिल्ह्यातील परीक्षा ह्या कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेशी संबंधित
विद्यार्थी, पालक, शिक्षक ते प्रशासनातील व समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावे,असे
आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
इयत्ता १० व इयत्ता १२वी च्या परीक्षा होऊ घातल्या आहेत. या परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी
शालांत परीक्षा दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, निवासी उपजिल्हाधिकारी
जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे,
नीलम बाफना, एकनाथ बंगाळे, संतोष गोरड, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी
(माध्य.) आश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, तसेच गटशिक्षणाधिकारी आदी
उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात
इयत्ता १२ वी साठी १५९ केंद्र असून ६५ हजार ५१६ परिक्षार्थी आहेत. इयत्ता १० वी साठी
२४० केंद्र असून ६९ हजार ५३० परिक्षार्थी आहेत.
जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर कॉपी होणार नाही यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात
आले आहेत. त्यात आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून त्याचे संनियंत्रण
जिल्हास्तरावरुन केले जाणार आहे. जिल्ह्यात २५२८ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात
आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अंकीत यांनी सांगितले की. पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्या स्तरावरुन परीक्षा
केंद्रावरील बंदोबस्ताचा आढावा घेण्यात यावा. परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर
बंद ठेवण्याची कारवाई कटाक्षाने पूर्ण करावी.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी
सांगितले की, कोणत्याही केंद्रावर एकही कॉपी होणार नाही याची दक्षता केंद्रप्रमुखांनी
घ्यावी. कॉपी आढळल्यास केंद्रप्रमुखांना जबाबदार धरले जाईल. गैरप्रकार झाल्यास पुढल्या
वर्षी परीक्षाकेंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल. गतवर्षी गैरप्रकार झालेल्या ६
केंद्रांची मान्यता रद्द झाली आहे. उन्हाचे दिवस असल्याने परीक्षा केंद्रावर आपल्या
पाल्यासोबत आलेल्या पालकांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात यावी. ती परीक्षा केंद्रापासून
दुर असावी. जे विद्यार्थी बाहेरगावाहून येतात त्यांना परीक्षा केंद्राचा पत्ता योग्य
देण्यात यावा. त्यांना किमान अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची सुचना
द्यावी. पोलीस, महसूल, शिक्षण, वीज कंपनी तसेच शाळा व्यवस्थापन, पालक, शिक्षक अशा सर्व
घटकांनी कॉपीमुक्त अभियानासाठी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
०००००




Comments
Post a Comment