‘दशसूत्री’ची प्रेरणाः वैष्णवीला आधार कृत्रिम पायाचा दिव्यांग विद्यार्थिनीच्या सक्षमतेसाठी एकवटली शाळा अन गाव
छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका)- ‘दशसूत्री’ हा जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी यांनी सुरु केलेला शैक्षणिक उपक्रम. विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास करण्याची
सुत्रे दशसूत्री मध्ये सांगण्यात आली आहेत. या दशसूत्रीच्या अंगिकाराचा परिणाम जिल्ह्यातील
शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहे.
वैजापूरच्या वैष्णवी नवनाथ मापारी
या इयत्ता १० वीतील विद्यार्थिनीला एक पाय नव्हता. खुब्यापासूनच पाय नसल्याने तिला
कृत्रिम पाय बसविणेही अशक्यप्राय. त्यात घरी दारिद्र्य... अशा वेळी तिच्या उपचारासाठी
शाळा आणि गाव धावून आला. जमा केलेल्या पैशातून तिच्यासाठी आधुनिक कृत्रिम पाय बनवला.
तो बसवला आणि सोमवारी म्हणजेच दि.९ फेब्रुवारीला वैष्णवी स्वतःच्या पायाने चालत शाळेत
गेली.
दशसूत्री या कार्यक्रमाच्यानिमित्ताने
गावागावात विद्यार्थी विद्यार्थिनी सक्षम, आरोग्यक्षम व्हावेत यासाठी शिक्षक गावकरी
पुढाकार घेत आहेत, याचेच हे द्योतक.
वैष्णवी ही १६ वर्षाची मुलगी. इयत्ता
१० वीत कैलास पाटील माध्यमिक विद्यालय, वैजापूर येथे शिकत आहे. तिच्या आयुष्याच्या
सुरुवातीलाच एका दुर्दैवी घटनेत डावा पाय खुब्यापासून काढावा लागला. पुढे या मुलीला
एका पायाने अक्षरशः उड्या मारत जगणं पत्करावं लागलं. इतर बालकांसारखं खेळणं बागडणं
तिच्या बालपणाचा भाग कधीच होऊ शकलं नाही. त्यात घरी वडील शेतकरी, आई गृहिणी. घरात दारिद्र्य.
तशाही परिस्थितीत शिक्षण सुरु झालं.
सतत एका पायानेच हालचाली कराव्या लागल्याने शरिराच्या संतुलनावर परिणाम झाला. तिच्या
पाठीच्या कण्यावर परिणाम होऊन तिला वेगवेगळे त्रास होऊ लागले. त्यातच मासिकधर्मामुळे
या त्रासात भरच पडली. परिणामी वैद्यकीय तपासण्यांचा
ससेमिरा सुरु झाला.
शाळेतील विशेष शिक्षक बाबासाहेब
जगताप यांनी वैष्णवीच्या समस्येत लक्ष घातले. डॉक्टरांच्या भेटी व चर्चेअंती हे लक्षात
आले की, शरीराच्या संतुलनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कृत्रिम पाय बसविणे हाच एकमेव
उपाय आहे. मुळात खुब्याचा सांधाच नसल्याने कृत्रिम पाय शरिरावर बसवायचा तरी कसा? हा
एक गंभीर प्रश्न होता. कारण शरिराला कृत्रिम अवयव जोडणे व मुळ सांध्याशी जुळवून घेणे
आवश्यक असते. इथं ती शक्यता जवळपास नव्हती.
त्यासाठी शिक्षक बाबासाहेब जगताप
यांनी अनेक संस्थांशी संपर्क साधला. विंग्ज ऑर्थो या मुंबईच्या संस्थेने वैष्णवीसाठी
विशेष पाय बनविण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी २ लाख ४० हजार रुपये इतका खर्च येणार
होता.
अशावेळी शिक्षक व समाजातील लोकांनी
बाबासाहेब जगताप यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वर्गणी गोळा केली. वैजापूर येथे द्रौपदी
लॉन्स मध्ये जिल्हाधिकारी स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या दशसूत्री
महिला सक्षमीकरण संवाद कार्यशाळेत आवाहनही करण्यात आले. त्यातूनही लोकवर्गणी
गोळा झाली.
त्यानंतर पाय बनविण्यासाठी मुंबईच्या
वाऱ्या सुरु झाल्या. पायाची चाचणी व तो बसविण्यासाठी १ ते २७ जानेवारी वैष्णवी तिचे
पालक व शिक्षक हे मुंबईत होते. तेथे तिला कृत्रिम पाय बसवून चालण्याचा, बसण्याचा, आवश्यक
दैनंदिन हालचालींचा सराव करण्यात आला. त्यानंतर ती दि.९ फेब्रुवारी रोजी स्वतःच्या
पायाने चालत शाळेत आली.
तिच्या शाळेत तिचे स्वागत झाले.
शिक्षकांच्या पाठपुराव्याची फलश्रृती झाली. काल (दि.१०) वैष्णवी आणि तिचे पालक, शिक्षक हे सगळे जिल्हाधिकाऱ्यांना
भेटण्यासाठी आले होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी तिचे स्वागत केले. हा एक भारावून
टाकणारा क्षण होता. वैष्णवीला स्वतःच्या पायावर उभे केल्याचे समाधान दशसूत्रीचे जनक
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तिचे शिक्षक बाबासाहेब जगताप आणि तिचे आई वडील यांच्या
चेहऱ्यावर झळकत होते. वैष्णवीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दुणावला होता.
०००००



Comments
Post a Comment