राज्य अन्न आयोगाची आढावा बैठक; गरजूंना वेळेत व गुणवत्तापूर्ण धान्य उपलब्ध करा-महेश ढवळे

 








        छत्रपती संभाजीनगर, दि. 16 (जिमाका) – कुणीही उपाशी राहू नये यासाठी गरजू लाभार्थ्याला वेळेत व गुणवत्तापूर्ण धान्य उपलब्ध करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून कोणतीही तक्रार आल्यास तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी आज दिले.

            महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आढावा घेतला. यावेळी अन्न आयोगाचे सदस्य सुभाष राऊत, बबन मसाले, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे,जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर तसेच संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीत अन्नधान्य साठा, वितरणाची नियमितता, लाभार्थ्यांची नोंदणी, ई-पीओएस यंत्रणेद्वारे धान्य वितरण, तक्रार निवारण व्यवस्था तसेच पारदर्शकता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांना वेळेत व गुणवत्तापूर्ण धान्य उपलब्ध होणे ही प्रशासनाची जबाबदारी असून कोणतीही तक्रार आल्यास तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. ढवळे यांनी दिले.

            अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळणे, पात्र लाभार्थ्यांचा समावेश करणे, नियमित तपासण्या करणे आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे यावर विशेष भर देण्यात यावा. अन्न सुरक्षा योजनेचा लाभ खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असेही श्री ढवळे यांनी निर्देशित केले.

            महाराष्ट्र शासनाचा ‘भूक व भीक मुक्त महाराष्ट्र हा संकल्प प्रत्यक्षात यावा, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला अन्नाचा मूलभूत हक्क मिळालाच पाहिजे. कोणताही नागरिक उपाशी राहू नये, हीच शासनाची आणि प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. या उद्देशाने समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी. यामध्ये रस्त्यांवरील सिग्नलवर भीक मागणारे, विधवा महिला, एकल जीवन जगणारे नागरिक, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला, दिव्यांग व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिक, ग्रामीण भागातील शेतमजूर तसेच सर्व क्षेत्रातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक यांचा प्राधान्याने विचार होणे आवश्यक आहे, त्यांच्यापर्यंत अन्न धान्य पोहोचेल यासाठी प्रयत्न व्हावेत,असे श्री. ढवळे म्हणाले.

           अन्न आयोग  जिल्ह्याच्या तीन दिवासाच्या दौऱ्यावर असून  सदस्य  जिल्ह्यातील शासकीय धान्य दुकानांना भेट देऊन वितरण प्रक्रियेची पाहणी करणार असून  लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा