फुलंब्री येथे तालुकास्तरीय महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळा संस्कारयुक्त शिक्षणातून सक्षम पिढी घडवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)- आजचा विद्यार्थी हा समाजाचा भविष्यातील कणा असल्यामुळे
त्यांच्या व्यक्तिमत्वात चांगले संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी रुजविणे अधिक
महत्त्वाचे आहे. शिक्षक व पालकांनी मिळून त्यास योग्य दिशा देणे आवश्यक आह, असे प्रतिपादन
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज फुलंब्री येथे केले.
राजर्षी शाहू महाविद्यालय, फुलंब्री येथे तालुकास्तरीय महिला
सक्षमीकरण व संवाद कार्यशाळा संपन्न झाली. उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार
योगिता खटावकर, संस्थेचे अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर,
सचिव उषाताई पाथ्रीकर, जिल्हा परिषद सदस्य गीतांजली पाथ्रीकर, सहसचिव वरुण पाथ्रीकर,
माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, गट शिक्षणाधिकारी
क्रांती धसवाडीकर, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन यांसह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, शिक्षकांनी आपल्या पदाची जाणीव
ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यार्थ्यांकडून नेहमीच शंभर टक्के
गुणांची अपेक्षा ठेवणे योग्य नाही, तर त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना घडविण्याचा प्रयत्न
करणे आवश्यक आहे. शाळा ही शिक्षण आणि सकारात्मकतेची जागा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित
करून स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.
जिल्हाधिकारी
स्वामी पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे चौथी-पाचवीपासूनच
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख करून देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये
वाचनाची सवय वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून “बुक बँक” आणि “वाचाल तर वाचाल” यांसारखे उपक्रम राबविले जात असल्याची
माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ. सचिन मोरे यांनी केले.गट शिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर यांनी उपस्थितांचे
आभार मानले.
०००००




Comments
Post a Comment