विशेष लेख - अपघात समयी मदतीस धावून येणारे ‘राह-वीर’
रस्ते अपघात ही एक मोठी समस्या आहे.
रस्त्यावरील प्रवास हा सुरक्षित करण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत.
नुकतेच सेव्ह लाईफ फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या
सर्व्हेक्षणात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सर्वाधिक अपघात होणाऱ्या जिल्ह्यांपैकी
एक आहे. सन २०२३-२४ मधील अहवालानुसार जिल्ह्यात ५२७ अपघाती मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत.
जिल्ह्यातील ९ प्रमुख मार्ग व २०९ अपघातप्रवण क्षेत्र नोंदविण्यात आले आहेत. या सर्व
अपघातप्रवण स्थळांवर जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यावरील आवश्यक
स्थापत्य बदल करणे, जनजागृती, वाहन आरोग्य तपासणी, वाहनचालकांचे प्रबोधन इ. अपघात घडल्यानंतर
जखमींना रुग्णालयात नेणे व प्रत्यक्ष उपचार सुविधा उपलब्ध होणे यातील कालावधी कमित
कमी करणे.
या सर्व प्रक्रियेत येणारे जाणारे
सहप्रवासी, शेतकरी, ग्रामस्थ, रस्त्या लगत व्यवसाय करणारे लोक इ. यांची भुमिका मोठी
मोलाची आहे. सामान्यपणे अपघातग्रस्तांना मदत केली तर उगाचच पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा
मागे लागेल म्हणून अनेक लोक हे मदत कार्य ही टाळत असतात. मात्र यामुळे कुणाच्या तरी
प्राणावर बेतते हे मात्र महत्त्वाचे. कुणाचाही असो जीव लाख मोलाचा असतो. एका व्यक्तीमागे
एक कुटूंब उध्वस्त होत असतं. अशावेळी चौकशीचा ससेमिरा मागे लागेल म्हणून ही मदत न करण्याची प्रवृत्ती किंवा भावनेपासून लोकांना
परावृत्त करण्यासाठी ही राह वीर योजना जाहीर केली आहे.
रस्ते अपघातातील जखमींना 'गोल्डन
अवर' (Golden Hour) मध्ये तातडीने मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या नागरिकांना
(Good Samaritans/ Rahveer) प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने 'राह-वीर ही नवीन
योजना जाहीर केली आहे. या योजनेत या राह वीरांना २५ हजार रुपयांचे पारितोषिकही दिले
जाते.
जिल्हास्तरावर या योजनेची प्रभावी
अंमलबजावणी करण्यासाठी
प्रत्येक जिल्ह्यात एक समिती असेल
ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी (DM) असतील. इतर सदस्यांमध्ये
खालील व्यक्तींचा समावेश असतो-
· पोलीस अधीक्षक (SSP)
· मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMOH)
· उप / प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO)
जेव्हा एखादा 'राह-वीर' अपघाताची
माहिती देईल, तेव्हा पोलिसांनी डॉक्टरांकडून खातरजमा करून त्याला अधिकृत पत्रावर 'पोचपावती'
(Acknowledgment) देतील व ते त्यांना अनिवार्य असेल.
जर नागरिक जखमीला थेट रुग्णालयात
घेऊन आला, तर रुग्णालयाने ही माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी त्याद्वारे पोलिसांना
पोचपावती देणे शक्य होते.
पोलीस ठाण्याकडून आलेल्या पोचपावतीची प्रत जिल्हा मूल्यमापन
समितीकडे पाठवली जाईल. ही समिती दरमहा आलेल्या प्रस्तावांचे पुनरावलोकन करेल आणि पात्र
नावांची यादी e-DAR पोर्टलच्या माध्यमातून राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे
(Transport Commissioner) पाठवेल.
प्रत्येक जिल्ह्याने दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या जिल्ह्यातील
३ सर्वोत्तम 'राह-वीरांची पाठवलेली नावे राज्यस्तरीय समितीकडे राष्ट्रीय पुरस्कारासाठी
शिफारस म्हणून पाठविली जातात. थोडक्यात कुणाचे तरी प्राण वाचवण्याचे कार्य अजोड आहे.
त्यास चालना देऊन सामाजिक जबाबदारीचे भान वाढविण्याचे व पर्यायाने रस्ते अपघातातील
जिवीत हानी कमी करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत, हे महत्त्वाचे.
-----संकलनः जिल्हा माहिती कार्यालय,
छत्रपती संभाजीनगर.
00000
Comments
Post a Comment