जिल्हा महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती ‘बालस्नेही’ करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





        छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- बालविवाह, बाल भिक्षेकरी, बाल कामगार, शाळा बाह्य मुले, बालकांचे आरोग्य यासारखे प्रश्न तळागाळापासून सोडविण्यासाठी शहरी व ग्रामिण भागात सारखेच प्रयत्न आवश्यक आहेत. त्यादृष्टिने ग्रामबाल संरक्षण समिती तयार करुन  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बालस्नेही कराव्या, असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

जिल्हा महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा श्रीमती संगिता राठोड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  महेंद्र दराडे,मनपा उपायुक्त लखीचंद चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे,  परिविक्षा अधिकारी रवि भिमनवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगला पांचाळ, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष रविंद्र नातनेश्वर आदी या बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिनियम, जिल्हा बालसंरक्षण समिती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, बाल भिक्षेकरी, बाल कामगार शोध मोहिम, बालविवाह प्रतिबंध, ग्राम बाल संरक्षण समिती, वार्ड बालसंरक्षण समिती, अनाथ बालकांचे प्रश्न, बालकांसंबंधी विविध पोर्टल,बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती,चाईल्ड हेल्प लाईन, पंचसुत्री बालकांची उपक्रम, कोविड मध्ये पालक गमावलेल्या बालकांसाठीचे जिल्हा कृती दल,प्रतिपालकत्व मंजुरी समिती, जिल्हा पुनर्वसन समिती, जिल्हा परिविक्षा समिती अशा विविध समित्यांचा आढावा सादर करण्यात आला.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती सोबत कायदेशीर कारवाई असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामिण भागातील ग्राम बाल संरक्षण समित्यांची स्थापना करुन त्या कार्यान्वीत करण्यात याव्या. तसेच शहरी भागात वार्ड बाल संरक्षण समित्यांची स्थापना करण्यात यावी.महसूल विभागामार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा समाधान शिबिराच्या ठिकाणी सुद्धा या योजनांची जनजागृती करण्यात यावी,असे निर्देश दिले. महिला व बालकल्याण विषयाचे कामकाज हे केवळ प्रशासकीय कामकाज नसून ते एक सामाजिक कार्य आहे. त्यादृष्टिने संवेदनशिलतेने ते हाताळावे,असेही त्यांनी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा