'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमलबजावणीचे निर्देश

 



 

छत्रपती संभाजीनगर,दि,२२(जिमाका)-  राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष दक्षता घ्यावी,असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ किरण पाटील यांनी केले आहे.

उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करण्यात यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून अधिनस्त संस्थाप्रमुखांना अवगत केले  आहे. तसेच पशुपालकांना मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे.

यामध्ये,

• पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा.

• शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या तीव्र उन्हाच्या काळात विश्रांती द्यावी. त्यांना सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या थंड जागी बांधावे.

• गोठ्याचे छत उष्णता रोधक असावे किंवा छतावर गवत/पालापाचोळा टाकून त्यावर पाणी मारावे. शक्य असल्यास स्प्रिंकलरचा वापर करावा. खिडक्यांना सावलीची व्यवस्था असावी.

• उष्णलहरी सुरू होण्यापूर्वी घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार यांसारख्या रोगांचे प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक औषधे पाजणे आवश्यक आहे.

तातडीच्या उपाययोजना व उपचार:

पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे (उदा. धापा टाकणे, तोंडावाटे लाळ गळणे, अस्वस्थता) दिसून आल्यास त्वरित तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. पशुधनावर थंड पाण्याचा मारा करावा. (अश्ववर्गीय प्राण्यांच्या बाबतीत पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे पाणी मारावे). जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

पशुसंवर्धन विभागाने सर्व क्षेत्रीय संस्थांना हवामान विभागाच्या संपर्कात राहून दैनंदिन तापमानाचा अंदाज घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक जीवरक्षक औषधे, व औषधी साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे. फिरती पशुवैद्यकीय पथके तातडीच्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात आली आहेत.

पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासन, अशासकीय संस्था, तसेच सामाजिक-सेवाभावी संस्थांना आवाहन केले आहे की, रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भांडी/हौद ठेवावेत. मृत पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य जागा आरक्षित ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

उष्णलहरींच्या काळात काय करावे?

• पशुधनासाठी नेहमी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी.

• पिण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत.

• पिण्याचे पाण्याचे हौद शक्यतो गोठ्याजवळ व सावलीत असावेत. नसल्यास त्यावर शेड उभारून थेट उन्हापासून संरक्षण करावे.

• चारा, वैरण व पशुखाद्याचा पुरेसा साठा करून ठेवावा.

• खाद्यात मिनरल मिक्श्चरचा समावेश करावा.

• उत्पादक व दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावा.

• गाभण पशुधनाच्या खाद्य व चाऱ्याची काळजी घ्यावी.

• आधुनिक गोठ्यांमध्ये 'स्प्रिंकलर' वापरावेत. इतर पशुपालकांनी पशुधनाच्या अंगावर पाणी फवारावे. म्हशींना शक्य असल्यास स्वच्छ पाण्याच्या हौदात बसण्याची सोय करावी.

• सायंकाळच्या दूध दोहनाची वेळ टप्प्याटप्प्याने किमान १ तास उशिरा ठेवावी, जेणेकरून उष्णतेचा ताण कमी होऊन उत्पादन टिकून राहील.

• पशुधनाला सावलीत व भरपूर खेळती हवा असलेल्या जागी बांधावे. निवाऱ्याच्या छतासाठी उष्णता रोधक साहित्याचा वापर करावा.

• पक्षीगृहाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. जाळ्यांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.

• शेती किंवा ओझे वाहणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते दुपारी ४ या तीव्र उन्हाच्या काळात पूर्ण विश्रांती द्यावी.

• उष्णतेपासून वाचवण्यासाठी अश्वाला त्याच्या  पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे थंड पाण्याचा हळुवार शिडकावा करावा.

• वराहांना पुरेसा निवारा, स्वच्छ पाणी व शक्य असल्यास पाण्यात बसण्याची सोय करावी.

• पाळीव प्राणी/पशूंना उन्हाच्या वेळी शक्यतो घरात किंवा सुरक्षित निवाऱ्यात ठेवावे.

• मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्याची जागा सार्वजनिक ठिकाणे व पाणवठ्यांपासून दूर व सुरक्षित असावी. तिथे तसा सूचना फलक लावावा.

• स्थानिक हवामानाचा अंदाज व दैनंदिन तापमानावर नियमित लक्ष ठेवावे.

उष्णलहरींच्या काळात काय करू नये?

• पशुधन उन्हाळ्यात उघड्यावर बांधू नये.

• पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जावू नये.

• शेती विषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये.

• पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये याची दक्षता घ्यावी.

• पशुधनाची गर्दी करू नये. दाटीवाटीने बांधु नये.

• भर उन्हात पशुधनाची हलचाल / वाहतुक करू नये.

• उन्हे असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करून नये.

• मृत पशुधन उघड्यावर टाकू नये.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा