बचत गटामुळे लता गायकवाड यांना मिळाला स्वावलंबनाचा मार्ग

 




        छत्रपती संभाजीनगर,दि,२३(जिमाका)- बिडकीन ता. पैठण येथील लता गंगाधर गायकवाड यांनी माविमंच्या माध्यमातून स्थापित बचतगटाच्या माध्यमातून आज स्वतःचा व्यवसाय उभारुन आपल्या संघर्षमय वाटचालीतून स्वावलंबन साकारले आहे.

            लता गायकवाड ह्या विवाहानंतर त्या बिडकीन येथे स्थायिक झाल्या. पती टॅक्सी चालक असून उत्पन्न मर्यादित असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होते. त्यामुळे त्यांनी शेतीमजुरी करून कुटुंबाला हातभार लावला. २००५ साली मुलीचा जन्म झाल्यानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्या. अशा परिस्थितीत त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा विचार सुरू केला. त्याचवेळी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत कार्यरत एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून त्यांना बचत गटाची माहिती मिळाली. त्यांनी प्रयत्नपूर्वक १० महिलांना एकत्र करून स्वामी समर्थ महिला बचत गट स्थापन केला व नियमित बचतीस सुरुवात केली.

            दरम्यान, मुलीच्या आजारपणाच्या वेळी तातडीने पैशांची गरज निर्माण झाल्यावर गटातून मिळालेल्या अंतर्गत कर्जामुळे उपचार करणे शक्य झाले. या अनुभवामुळे बचत गटाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवले.

            यानंतर गटाच्या माध्यमातून बँकेकडून कर्ज मिळवून त्यांनी किराणा दुकान सुरू केले. सध्या त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू असून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. तसेच गटातील इतर महिलांनीही विविध व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या असून त्यांचे नियमित उत्पन्न सुरु झाले आहे.

            बचत गटामुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण लता गायकवाड यांनी घालून दिले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा