यशकथा

 

बँक सखी ते लखपती दीदींची आधारस्तंभ: कावेरी जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'बँक सखी' हे पद केवळ एक नोकरी नसून ती एक क्रांती ठरू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कावेरी  भाऊसाहेब जाधव. २०१८ पासून बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुका, वेरूळ आणि परिसरातील गावांमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा जो ठसा उमटवला आहे, तो आज हजारो महिलांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

बचत गटातून सक्षमीकरणाकडे

कावेरी जाधव यांचा प्रवास एका सामान्य बचत गटापासून सुरू झाला. चिंतामणी बचत गट आणि संजीवनी स्वयं सहायता समूह पासून. त्यांची जिद्द आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी स्वतःला केवळ एका गटापुरते मर्यादित न ठेवता विविध ग्रामसंघ आणि समूहांना जोडण्याचे काम केले. शासनाच्या विविध योजना आणि बँकिंग व्यवहारांमधील दुवा म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी भूमिका बजावली आहे.

'छोटी बँक' म्हणून ओळख

ग्रामीण भागात बँकेचे व्यवहार करणे, कर्ज मिळवणे किंवा कागदपत्रांची पूर्तता करणे हे आजही आव्हानात्मक मानले जाते. कावेरी यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी महिलांना मोलाची मदत केली.यात

 बँकिंग सेवा,नवीन खाते उघडणे, पॅन आणि केवायसी अपडेट करणे, मोबाईल लिंकिंग आणि विमा योजनांचे लाभ मिळवून देणे आणि विमा पॉलिसीच्या पावत्या यांसारख्या किचकट कागदपत्रांची पूर्तता करण्यात त्यांनी महिलांना सुलभता निर्माण करून दिली.

खुलताबाद तालुक्यातील तलाववाडी, आखातवाडा, पिंपरी, पळसवाडी, चिंचोली आणि सांदलवाडी यांसारख्या दुर्गम भागातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांनी आर्थिक साक्षरता पसरवली.

लखपती दीदींचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी

कावेरी जाधव यांनी आतापर्यंत १५६ बचत गटांतील सुमारे १५०० महिलांना मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ४० ते ४५ विविध उद्योगांसाठी १कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात यश मिळवले आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज अनेक महिला 'लखपती दीदी' झाल्या असून, त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत एकही बँक खाते NPA (थकीत कर्ज) झाले नाही, हे त्यांच्या कामाचे आणि महिलांच्या प्रामाणिकपणाचे मोठे यश आहे.

बँक  कामकाजासह सामाजिक बांधिलकी

 

बँकिंग कामाव्यतिरिक्त कावेरी जाधव यांनी शासनाच्या विविध सामाजिक योजनांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छता अभियानाचा प्रसार. मतदार यादी सर्वेक्षण आणि जनगणनेसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये त्याचा सहभाग आहे.

 आरसेटी (RSETI) च्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, हॉटेल, फळ विक्री, ज्यूट बॅग निर्मिती , पापड लोणचे उत्पादन आणि कापड व्यवसाय यांसारख्या उद्योगांसाठी महिलांना प्रशिक्षण व स्टॉल मिळवून देण्यासाठी  समन्वयक यांची भूमिका बजावली आहे.

आर्थिक स्वावलंबन आणि सन्मान

आज कावेरी जाधव आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून दरमहा १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. गावकऱ्यांनी त्यांना दिलेली 'छोटी बँक'ही पदवी त्यांच्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे. बँकसखी  बरोबरच ग्रामीण महिलांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणणारी 'लक्ष्मी' म्हणून त्या ओळखल्या जात आहेत.कावेरी जाधव यांनी आपल्या कष्टाने केवळ स्वतःची ओळख निर्माण केली नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवून एक नवा 'विश्वासबंध' निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील बँकांची सेवा ही विश्वासाच्या नात्यावर अवलंबून असते. त्याचबरोबर त्या विश्वासास पात्र ठरत महिलाना एक सखी, मैत्रीण म्हणून दिलेला हात तो आर्थिक सक्षमीकरणाचा पाया मजबूत करणारा ठरला आहे.

 

                                                                                      डॉ. मीरा ढास,माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा