माविमच्या सहाय्यातून सुनंदा गाढे यांचे आर्थिक स्वावलंबन

 




 

छत्रपती संभाजीनगर,दि,२२(जिमाका)-  पैठण तालुक्यातील कौडगाव येथील सुनंदा सुनील गाढे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या मदतीने संघर्षातून यशाकडे वाटचाल करत स्वतःचा डाळमिलचा व्यवसाय उभारला आहे. त्यांच्या या यशोगाथेमुळे परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. त्यांच्या गटातील अन्य महिलाही आता लहान मोठे व्यवसाय करुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत.

श्रीमती सुनंदा गाढे यांचे कुटुंब पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर आधारित होते. ओला व कोरडा दुष्काळ यामुळे उत्पन्नात अनिश्चितता निर्माण होत होती. अशा परिस्थितीत शेजारच्या महिलेकडून त्यांना बचत गटाची माहिती मिळाली. त्यांनी पुढाकार घेत गावातील गरजू महिलांना एकत्र करून बँक ऑफ महाराष्ट्र येथे बचत गटाचे खाते सुरू केले.

दरमहा नियमित बचत आणि अंतर्गत कर्ज व्यवहार सुरू केल्याने गटातील महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ लागल्या. सहयोगिनी ज्योती बादाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटाची आर्थिक स्थिती मजबूत झाली. याच बळावर सुनंदा यांनी डाळ मिल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या कर्ज सहाय्यामुळे त्यांनी हा उद्योग उभारला.

डाळीची गुणवत्ता उत्कृष्ट असल्यामुळे व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. आज त्या दररोज सुमारे १००० ते १५०० रुपयांचे उत्पन्न मिळवत असून दोन महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षणीय सुधारली आहे.

सुनंदा यांच्या बचत गटातील इतर महिलांनीही पापड, लोणचे यांसारखे लघुउद्योग सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. माविमच्या माध्यमातून गटाला विविध शासकीय योजना मिळाल्या असून आरोग्य तपासणी शिबिरे, हिमोग्लोबिन, रक्तदाब व शुगर तपासणी यांसारख्या सुविधा गावात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

याशिवाय, त्यांनी गावात माविम मित्र मंडळ ही स्थापन केले आहे. त्याद्वारे महिलांना पुरुषांचेही सहकार्य मिळत आहे. माविमच्या एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या पाठबळामुळे आम्ही सक्षम झालो असून कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास तयार आहोत, असे सुनंदा गाढे यांनी सांगितले.

सुनंदा गाढे यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून, माविमच्या उपक्रमांची प्रभावीतता अधोरेखित करत आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा