माविमची साथ आणि परिश्रमाच्या जोडीतून अगरबत्ती उद्योगाचा दरवळ

 




 

छत्रपती संभाजीनगर,दि.२३(जिमाका)- पैठण तालुक्यातील ईसरवाडी येथील वर्षा अशोक ढाकणे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनातून अगरबत्ती व्यवसाय उभारून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे.

वर्षा ढाकणे या स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या सदस्य असून त्यांचे कुटुंब दोन मुली व एक मुलगा असे आहे. पती कंपनीत नोकरीला असून त्या स्वतः मजुरी करत होत्या. मात्र या उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला केवळ १६०० रुपयांमध्ये अगरबत्तीचा कच्चा माल आणून त्यांनी छोट्या प्रमाणात विक्री सुरू केली. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी मशीन घेण्याचा विचार केला. यासाठी आवश्यक भांडवल नसल्याने त्यांनी माविम अंतर्गत एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून बचत गट स्थापन केला.

गटातून अंतर्गत कर्ज मिळाल्यानंतरही मोठ्या गुंतवणुकीसाठी अधिक निधीची गरज होती. यासाठी साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आयसीआयसीआय बँकेकडून सुमारे २ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. या निधीतून त्यांनी अगरबत्ती तयार करण्यासाठी मशीन, मिक्सर व ड्रायर खरेदी करून उत्पादन सुरू केले.

सध्या त्यांच्या उद्योगातून दररोज ३० ते ५० किलो अगरबत्ती उत्पादन होते. वाढत्या मागणीमुळे त्यांनी घाऊक विक्रीही सुरू केली असून महिन्याला सुमारे २००० किलो उत्पादन केले जाते. या व्यवसायातून त्यांना दरमहा ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

या उत्पन्नातून त्यांनी अडीच एकर शेती तसेच एक प्लॉट खरेदी केला आहे. आज त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या असून इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

माविम आणि एकता लोकसंचालित साधन केंद्राच्या वेळेवर मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाल्याचे त्या सांगतात. महिलांनीही उद्योगधंद्यात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा