अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेची प्रक्रिया सुलभ; 'होल्ड' आणि 'ब्लॉक' प्रकरणांबाबत बदल*
छत्रपती संभाजीनगर,दि.१७(जिमाका)अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत
राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ
आणि पारदर्शक करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची
धावपळ थांबवण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महामंडळाने
नवीन सुधारणा लागू केल्या आहेत.
बँक मंजुरी स्तरावर अपूर्ण कागदपत्रांमुळे
(Reject for Incomplete Documents) नाकारण्यात आलेली प्रकरणे आता लाभार्थ्यांना त्यांच्या
स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येतील. लाभार्थी ही कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने स्वतः अपलोड
करू शकणार आहेत. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी
'Submit' पर्याय उपलब्ध होईल आणि त्यानंतर ती प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी मुख्यालयाकडे
पाठवली जातील.
व्याज परतावा क्लेम सादर करताना
काही कारणांमुळे 'Hold' स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना कारणासहित त्यांच्या
लॉगिनवर दिसणार आहेत. अशा लाभार्थ्यांनी १५ दिवसांच्या आत संबंधित त्रुटींची पूर्तता
जिल्हा समन्वयकांमार्फत करून घ्यावी. भविष्यात ही सुविधा थेट लॉगिनवर देण्याचे कामही
महामंडळाकडून सुरू आहे.
पूर्वीच्या पद्धतीनुसार, व्याज परताव्याची
रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरच पुढचा क्लेम सादर करता येत असे. मात्र, सुधारित प्रणालीमध्ये
लाभार्थ्यांचा क्लेम 'Sent for CAFO' या स्तरावर पोहोचताच त्यांना पुढील क्लेम सादर
करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे.
एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक,
बँक तपशीलातील विसंगती किंवा कागदपत्रांमधील खाडाखोड आढळल्यामुळे काही प्रकरणे
'Block' करण्यात आली आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर येथील बनावट कागदपत्रांच्या प्रकरणांनंतर
ही खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे अशा तांत्रिक कारणांमुळे ब्लॉक
झाली आहेत, त्यांनी योग्य त्या दुरुस्त्यांसह किंवा मूळ कागदपत्रांसह जिल्हा समन्वयकांकडे
अर्ज सादर करावेत .लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. योजनेच्या सर्व
प्रक्रियेसाठी केवळ महामंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीचाच वापर करावा असे आवाहन अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक समाधान सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी
पत्रकाद्वारे केले आहे.
00000
Comments
Post a Comment