जिल्ह्यात ७३.६९ टक्के मतदारांचे मॅपिंगचे काम पूर्ण; मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश

 


छत्रपती संभाजीनगर,दि,२४(जिमाका)- विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अंतर्गत जिल्ह्यात मतदार मॅपिंगचे काम सुरू आहे. या मोहिमेत दि. २४ एप्रिल पर्यंत एकूण ३२ लाख ५१ हजार ८६२ मतदारांपैकी  २३ लाख ९६ हजार ३२३ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून एकूण प्रगती ७३.६९  टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे,अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधरी यांनी दिली आहे. उर्वरित काम गतिने पूर्ण करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले.

            विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगतीमध्ये सिल्लोड (८६.३९%), कन्नड (८९.८०%), फुलंब्री (६९.६८%), औरंगाबाद मध्य (५४.९०%), औरंगाबाद पश्चिम (५८.८५%), औरंगाबाद पूर्व (५८.०८%), पैठण (८२.२१ %), गंगापूर (७७.५७%) आणि वैजापूर (९२.५३%) अशी नोंद झाली आहे.

            या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सविता चौधरी यांनी नायब तहसीलदार निवडणूक यांची बैठक घेतली. बैठकीत प्रत्येक मतदारसंघातील प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी प्रगती कमी आहे, तेथे विशेष लक्ष देऊन काम गतीमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

            मतदार मॅपिंग मोहिमेत जनजागृती व लोकसहभाग वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांचा सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवून शंभर टक्के मॅपिंग पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

            ज्या भागांमध्ये कामाची गती मंद आहे, तेथे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन कामकाज वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासनाकडूनही प्रत्यक्ष फिल्ड भेटी घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

            दरम्यान, नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदान मॅपिंग प्रक्रियेसाठी घरी येणाऱ्या बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांना अचूक माहिती द्यावी, तसेच सन २००२ मधील मतदार यादीत आपला समावेश कोठे होता याची माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा