पनीर की चीज ॲनालॉग? मेन्यू कार्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक
छत्रपती संभाजीनगर,दि.८(जिमाका)- पनीर आणि चीज ॲनालॉग हे दोन अन्नपदार्थ
वेगवेगळे असून दोघांचेही पोषणमूल्य वेगवेगळे आहे. याबाबत ग्राहकाला स्पष्ट कल्पना यावी
यासाठी मेन्यू कार्डवर तसा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे हॉटेल्स, अन्न
व्यावसायिक या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश
अन्न व औषध प्रशासनाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे
पाटील यांनी कळविले आहे की, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, केटरर्स, फास्टफुड विक्रेते इ. अन्न
पदार्थ तयार करतांना त्यात पनीर ऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करतात. तथापि, पनीर व चीज ॲनालॉग
हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. त्यांचे पोषणमूल्य वेगळे आहे.
पनीर हा दुधापासून बनवला जाणारा पदार्थ आहे. आणि चीज ॲनालॉग
हे खाद्यतेल,स्टार्च, फुड ॲडीटीव्ह यांचा वापर करुन तयार केले जाते.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नियम व नियमने २०११ अन्वये
चीज ॲनालॉगच्या उत्पादन, विक्रीला किंवा वापराला बंदी नाही मात्र जे ग्राहक हा पदार्थ
अन्न म्हणून ग्रहण करतात त्यांना हा पदार्थ खाण्या/ वापरण्याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी
अन्नपदार्थातील घटकांची माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे.
तसेच अन्न सुरक्षा व मानके नियम
२०२० नुसार अन्न व्यावसायिकांनी अन्न विक्री करतांना संबंधित पदार्थाची पोषण घटकांची माहिती स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक
आहे. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांना आपल्या आस्थापनांचे मेन्यू कार्ड, इलेक्ट्रॉनिक
डिस्प्ले इ. ठिकाणी चीज ॲनालॉग बाबत स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.
याबाबत दि.१ मे पासून हॉटेल्स, केटरर्स, रेस्टॉरन्ट्स असा अन्न
व्यावसायिकांच्या तपासणी करण्यात येणार आहेत. चीज ॲनालॉगबाबत निर्देशांचे पालन न झाल्यास
कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. सह आयुक्त (अन्न) यांचे पथक ही कारवाई करतील.
तसेच पनीर व चीज ॲनालॉग हे दोन वेगवेगळे पदार्थ असल्याबाबत ग्राहकांमध्ये
जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment