विशेष सखोल पुनरिक्षण; मतदार मॅपिंगचे काम दि.१० पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात
येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार मॅपिंगच्या
कामाला वेग आला आहे. येत्या दि.१० मे पर्यंत जिल्ह्यातील मॅपिंगचे काम पूर्ण करावे
असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील मॅपिंगच्या
कामाला वेग आला असून बुधवार दि. ६ पर्यंत जिल्ह्यातील एकूण ३२,४४,२५८ मतदारांपैकी २४,१५,०३५
मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून एकूण प्रगती ७४.४४ टक्क्यांवर पोहोचली आहे,अशी माहिती
उपजिल्हा निवडणूक अधिकारी सरिता चौधरी यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी विनय गोडा यांनी संबंधित सर्व मतदार नोंदणी अधिकारी,
विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि सुपरवायझर यांना
हे काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, मॅपिंगदरम्यान काही मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर
आढळून न आल्याचे तसेच काही मतदार मृत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित मतदारांना ‘स्थलांतरित मतदार’ व ‘मृत मतदार’
या वर्गवारीत समाविष्ट करून नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
SIR अंतर्गत मतदार मॅपिंग ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून
त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक होण्यास मदत होते. यामुळे पुनरावृत्ती
टाळली जाते तसेच स्थलांतरित, मृत किंवा अनुपलब्ध मतदारांची नोंद व्यवस्थित ठेवता येते.
परिणामी निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व निष्पक्ष बनते.
या प्रक्रियेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने
केले आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरी भेट देत असताना आवश्यक माहिती देऊन
सहकार्य करावे, तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध BLO माहितीच्या आधारे
संपर्क साधून स्वतःचा तपशील अद्ययावत करून मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
०००००
Comments
Post a Comment