‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुक स्वयंसेवकांना आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)- जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार आपदा मित्रांचे कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या योजनेंतर्गत (Up Scacaling Aapda Mitra) आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हा १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून इच्छुक स्वयंसेवकांची अंतिम बॅच दि. २२ मे रोजी कोलाड, जि. रायगड येथे रवाना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवकांनी आपली नावे नोंदवावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जनार्दन विधाते यांनी केले आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत आहे. सहभागी प्रत्येक आपदा मित्राला वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच (ERK) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच तीन वर्षांसाठी पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार असून येणे-जाणे, निवास व भोजनाची व्यवस्था शासनामार्फत आणि नियुक्त संस्थेमार्फत विनामूल्य करण्यात येणार आहे. महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच तसेच प्रवासाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रशिक्षणासाठी इच्छुक व यापूर्वी नामनिर्देशन सादर केलेल्या स्वयंसेवकांनी आवश्यक कागदपत्रे दि. २० मे  पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, टी.सी. किंवा राष्ट्रीयत्वाचा पुरावा, महाविद्यालयाचे ओळखपत्र, पासपोर्ट फोटो तसेच नोकरी करत असल्यास नोकरीचे ओळखपत्र यांचा समावेश आहे.

आपदा मित्र निवडीसाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावी. वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंते, शास्त्रज्ञ तसेच आपत्कालीन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे असेल. तथापि, त्यांना विमा संरक्षण लागू राहणार नाही.

या प्रशिक्षणासाठी नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, आशा व अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खासगी सुरक्षा रक्षक तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय महामंडळे, महावितरण, एस.टी. महामंडळ, पोस्ट कार्यालये आणि इतर शासकीय, निमशासकीय व कंत्राटी कर्मचारी पात्र राहणार आहेत.

अधिक माहितीसाठी दीपक राजेंद्र उदावंत (मो. ७०५८०१०४५०) तसेच मोहम्मद अर्शी खान (मो.९९१०७२८४८७), DDMS, छत्रपती संभाजीनगर (ई-मेल : dddmoaurangabad16@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा