पथदर्शी प्रकल्पः मोबाईल ॲपद्वारे खत वितरण; शुक्रवार (दि.५) पासून जिल्ह्यात सुरुवात गावपातळीपर्यंत माहिती पोहोचवा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका)- राष्ट्रीय खत विक्री आराखड्यानुसार  मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी व खरेदी करता येणार आहे. खत वितरण प्रणालीच्या या पथदर्शी प्रकल्पासाठी राज्यात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. येत्या शुक्रवार दि.५ जून पासून हा प्रकल्प सुरु होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रणालीची माहिती पोहोचवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज खतविक्री प्रणालीच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेण्यात आला.  तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचा बैठकीत सहभाग होता. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी , तहसिलदार आदी उपस्थित होते. तर तालुका कृषी अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शुक्रवार दि.५ पासून केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणाचा नॅशनल फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

१. या प्रकल्पामध्ये ऍग्रीस्टॅक (Farmer ID) व खत वितारणाच्या आय.एफ.एम.एस. प्रणालीचे एकत्रिकरण करण्यात आले आहे.

२. खत वितरणासाठी शेतकऱ्यांसाठी Framework For Fertilizer Sale हे ॲप तयार करण्यात आले असून या ॲपद्वारे शेतकऱ्याने अनुदानित खताची बुकिंग करावयाची आहे. हे ॲप प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.

३. या ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून खत घेण्याची गरज नाही.

४. ॲपद्वारे अनुदानित खत शेतकऱ्याच्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्राकडे बुक केल्यानंतर ॲपमध्ये एक ‘क्यू आर कोड’ निर्माण होईल. बुक केलेले खत तीन दिवस शेतकऱ्यांच्या नावे संबंधित कृषी सेवा केंद्रांवर बुक राहणार आहे. या तीन दिवसात शेतकऱ्याने त्याच्या सवडीने जाऊन संबंधित कृषी सेवा केंद्रावर QR कोड स्कॅन करुन खताची उचल करावयाची आहे.

५. शेतकऱ्याने खरेदी केलेल्या प्रत्येक अनुदानित खताच्या गोणीची नोंद या प्रणालीमध्ये राहणार आहे.

६. या प्रणालीमुळे अनुदानित खतांचे समन्यायी वाटप होणार आहे.

७. या प्रणालीमुळे अनुदानित खाताच्या गैरवापरास प्रतिबंध घातला जाणार आहे.

सद्यस्थितीत दुकानांमध्ये खत उपलब्ध आहे किंवा नाही हे समजत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याचे दिसून येते,वरील प्रणालीमुळे या गोष्टी टाळता येणार आहेत.

शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

ॲपच्या वापराबाबत शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगा. गावपातळीपर्यंत माहिती पोहोचवा. खत विक्रेत्यांना यात सहभागी करुन घ्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

असे वापराल खत खरेदीसाठी फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर ॲप-

१.         लॉगिन करा

          मोबाईलमध्ये ॲप उघडा.

          राज्य (State) निवडा.

          आधार क्रमांक प्रविष्ट करा.

          प्राप्त OTP टाकून पडताळणी पूर्ण करा.

२. जमिनीची नोंदणी करा

          जमीन स्वतःची, भाडेकरू अथवा संयुक्त मालकीची असल्यास योग्य पर्याय निवडा.

          जिल्हा, तालुका, गाव व सर्व्हे/गट क्रमांक भरा.

          Fetch Land वर क्लिक करून जमिनीची माहिती प्राप्त करा.

३. पीक निवडा

          हंगाम (खरीप/रब्बी/उन्हाळी) निवडा.

          लागवड केलेले पीक निवडा.

          निवडलेल्या पिकानुसार खताची शिफारस उपलब्ध होईल.

४. खतासाठी अर्ज करा

          शासनाच्या GFR (General Fertilizer Recommendation) नुसार शिफारस केलेली खतांची यादी व प्रमाण दिसेल.

          आवश्यकतेनुसार खत निवडा.

५. खताचे प्रमाण निश्चित करा

          आवश्यक बॅगांची संख्या निवडा.

          एका अर्जामध्ये एकापेक्षा अधिक प्रकारची खते निवडता येतील.

६. विक्रेता निवडा

          जवळील उपलब्ध खत विक्रेत्यांची यादी दिसेल.

          उपलब्ध साठा व अंतर पाहून योग्य विक्रेता निवडा.

७. खत घेणारी व्यक्ती निवडा

          खत स्वतः घेणार असल्यास "स्वतः" पर्याय निवडा.

          प्रतिनिधीमार्फत घेणार असल्यास त्याची माहिती भरा.

          आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक पडताळणी आवश्यक आहे.

८. QR टोकन प्राप्त करा

          अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर QR Code व Token Number तयार होईल.

          हा QR Code सुरक्षित जतन करून ठेवा.

 ९. खत प्राप्त करा

          निवडलेल्या विक्रेत्याकडे जाऊन QR Code दाखवा.

          विक्रेता QR Code स्कॅन करून अर्ज व प्रमाण तपासेल.

          व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खत प्राप्त करा व पावती घ्या.

महत्त्वाच्या सूचना

️ आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.

️ जमिनीची माहिती अद्ययावत असावी.

️ GFR नुसार शिफारस केलेले खत तपासून घ्यावे.

️ QR Code सुरक्षित जतन करावा.

️ चुकीची माहिती भरल्यास अर्ज विलंबित होऊ शकतो.

️ खत खरेदी केवळ नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच करावी.

तक्रार निवारण

अर्ज किंवा खत वितरणासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास संबंधित कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. प्राप्त तक्रारींची पडताळणी करून पात्र प्रकरणांवर कार्यवाही करण्यात येईल.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा