जिल्ह्यातील एचपीव्ही आणि बीसीजी लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

 





छत्रपती संभाजीनगर,दि.३(जिमाका)-"जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी बालकाला आवश्यक असलेल्या सर्व लसींचे लसीकरण  पालकांनी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एचपीव्ही, पोलिओ, गोवर-रुबेला आणि बीसीजी या लसीकरणाचे सर्व डोस मुलांना वेळेत देण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्य विभागाने शंभर टक्के पूर्ण करावे," असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लसीकरण टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगल पांचाळ, समाज कल्याण अधिकारी बी. जी. अरवत, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भांबरे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लब आणि लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.

शाळांमध्ये पालक सभांच्या माध्यमातून जनजागृती करा

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरणामध्ये जिल्ह्याचे प्रमाण सध्या कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून एकत्रित काम करणे गरजेचे आहे. मुलींच्या पालकांमध्ये या लसीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण विभागाने शाळांमध्ये विशेष पालक सभांचे आयोजन करावे.

वैजापूर, संभाजीनगर, सोयगाव आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये बीसीजी आणि पोलिओ लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. या भागात विशेष मोहीम राबवून एचपीव्ही, बीसीजी आणि गोवर-रुबेला लसीकरणाचे उद्दिष्ट त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

२८ जून रोजी पोलिओ लसीकरण मोहीम

'पोलिओ मुक्त भारत' अभियानांतर्गत जिल्ह्यात दिनांक २८ जून२०२६  रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाभरात बूथ स्तरावर आणि घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, शिक्षण, अंगणवाडी, आरोग्य विभाग तसेच विविध सामाजिक संस्था आणि एनएसएस (NSS) च्या सहकार्याने ही मोहीम राबवावी.रेल्वे स्थानके, बस स्थानके, ग्रामीण भाग तसेच स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनाला पालक सभांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे निर्देश द्यावेत आणि यात आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा. पावसाळ्याच्या दिवसांत उद्भवणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ग्रामीण भागात ओआरएस (ORS) पावडर, झिंक आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा.

 

पालकांनी आपल्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी स्वतःहून पुढे यावे. तसेच पोलिओ, बीसीजी आणि गोवर-रुबेला लस देण्यासाठी सक्रिय पुढाकार घेत आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जाऊन बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा