महासंस्कृती महोत्सवास प्रेक्षकांची गर्दी ;अवधूत गुप्तेंच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अवधूत गुप्तेंच्या संगिताच्या तालावर सादर झालेल्या गीत श्रवणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने संगीत श्रवणाचा आनंद घेतला.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने
आयोजित ‘महासंस्कृती’ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि.२३) अवधूत गुप्ते यांचे
सादरीकरण झाले. त्यासमवेत स्थानिक कलावंतांनी लोककलांचे सादरीकरण केले. रसिकांनी
उत्स्फूर्त दाद दिली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद
लोखंडे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, पैठण -फुलंब्रीच्या
उपविभागीय अधिकारी श्रीमती बाफना , उपविभागीय अधिकारी
राठोड, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, नायब तहसीलदार बारवाल, विजय चव्हाण यांच्यासह
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सहकुटुंब
उपस्थित होते.
प्रारंभी स्थानिक कलावंट शेखर भाकरे
आणि रामदास धुमाळ यांच्या कलापथकाने विविध कलाप्रकार सादर केले. शेखर भाकरे यांनी
वासुदेव ,बुर्गुंडा हा कलाप्रकार सादर केला . त्याद्वारे त्यांनी शासनाच्या विविध योजनांची
माहितीही दिली. विवीध कलाप्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचत असतात.
रामदास धुमाळ यांनी गोंधळगीत आणि छत्रपती संभाजी महााजांबद्दल पोवाडा गायनातून
राष्ट्रप्रेम जागृत केले. तसेच छत्रपती संभाजीनगरची लावणी
सादर केली. त्यातून छत्रपती संभाजीनगर
मधील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि वैशिष्टांची महिमा सादर केली व रसिकांना मंत्रमुग्ध
केले. सुमित धुमाळ यांनीही छत्रपती संभाजीनगरचे
वैभव आपल्या गायनातून सादर केले.
अवधूत गुप्ते यांच्या वाद्यवृंदाने मराठी
गाणी सादर करुन रसिकांना ठेका धरायला लावला. त्यात ‘राधा ही बावरी हरीची’, ‘तूच माझी आई देवा
तूच माझा बाप’ या गितासोबतच ‘तुझे देख के मेरी मधुबाला’ या गाण्यांना रसिकांनी
उत्स्फूर्त दाद दिली. ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ या गीताने रसिक अंतर्मूख
झाले. अवधूत गुप्तेंच्या चमूने सादर केलेल्या गीत गायनाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त
प्रतिसाद दिला.
०००००
Comments
Post a Comment