टपाल तिकीट संग्रहाला चालना देण्यासाठी दीनदयाळ स्पर्श योजना; वार्षिक १६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती
छत्रपती
संभाजीनगर, दि. ७ (जिमाका)- विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटांचा संग्रह व अभ्यास अर्थात
‘फिलाटेली’ (Philately) या ज्ञानवर्धक छंदाची आवड निर्माण व्हावी, टपाल तिकिटांमधील
अभिरुची व संशोधनाला प्रोत्साहन मिळावे, याकरीता
भारतीय डाक विभागाच्या वतीने ‘दीनदयाळ स्पर्श योजना २०२६-२७’ राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत लेव्हल-१
फिलाटेली लेखी प्रश्नमंजुषा (Philately Written Quiz) परीक्षा रविवार, दि. २७ सप्टेंबर
२०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत आयोजित करण्यात येणार आहे.
टपाल तिकिटे ही केवळ पत्रव्यवहारासाठी
वापरली जाणारी साधने नसून त्यातून देशाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, कला, विज्ञान, वारसा,
सामाजिक जीवन, राष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या नामवंत व्यक्तींची माहिती मिळते. विद्यार्थ्यांनी टपाल तिकिटांचा संग्रह करण्याबरोबरच
त्यांचा अभ्यास करावा आणि फिलाटेलीच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी करावी, यासाठी भारतीय
डाक विभागाकडून या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
इयत्ता
सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना संधी
दीनदयाळ स्पर्श योजना २०२६-२७ मध्ये इयत्ता सहावी, सातवी, आठवी
आणि नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय डाक विभागाच्या विहित मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र विद्यार्थी या योजनेच्या
निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच संशोधनवृत्ती,
निरीक्षणक्षमता, सर्जनशीलता आणि विविध विषयांबाबत कुतूहल निर्माण करण्याच्या दृष्टीने
फिलाटेली हा उपयुक्त शैक्षणिक छंद आहे.
दोन स्तरांत
होणार निवड
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची
निवड दोन स्तरांमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या स्तरात फिलाटेली लेखी प्रश्नमंजुषा
घेण्यात येईल. रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या लेखी प्रश्नमंजुषेत सद्य घडामोडी,
इतिहास, भूगोल, विज्ञान, क्रीडा, कला व संस्कृती, नामवंत व्यक्ती, स्थानिक फिलाटेली
आणि राष्ट्रीय फिलाटेली आदी विषयांवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल.
पहिल्या स्तरातील लेखी प्रश्नमंजुषेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना
दुसऱ्या स्तरासाठी पात्र ठरविण्यात येईल. दुसऱ्या स्तरात संबंधित विद्यार्थ्यांना भारतीय
डाक विभागाच्या विहित मार्गदर्शक सूचनांनुसार ‘फिलाटेली प्रकल्प’ सादर करावा लागणार
आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची टपाल तिकिटांविषयीची आवड, त्यांचा अभ्यास, विषयाची
मांडणी आणि संशोधनात्मक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
वार्षिक १६ हजार रुपये शिष्यवृत्ती
दीनदयाळ स्पर्श योजनेच्या निवड प्रक्रियेत
पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक १६ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासाबरोबरच फिलाटेलीसारखा ज्ञानवर्धक व सर्जनशील छंद
विकसित करण्यास प्रोत्साहन देणे हा या शिष्यवृत्तीमागील उद्देश आहे.
फिलाटेलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती
एकाच ठिकाणी मिळू शकते. टपाल तिकिटांवर प्रसिद्ध होणाऱ्या ऐतिहासिक घटना, राष्ट्रीय
व्यक्तिमत्त्वे, वैज्ञानिक प्रगती, कला-संस्कृती, जैवविविधता, क्रीडा, साहित्य आणि
देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानवृद्धीसाठी
उपयुक्त ठरतो.
शाळा व
पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे
भारतीय डाक विभागाने सहभागी शाळा,
विद्यार्थी व पालकांना या योजनेत उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले आहे. शाळा आणि पालकांनी
विद्यार्थ्यांना फिलाटेली या ज्ञानवर्धक व शैक्षणिक छंदाकडे वळण्यासाठी प्रोत्साहित
करावे. टपाल तिकिटांच्या माध्यमातून देशाचा समृद्ध इतिहास, संस्कृती व वारसा समजून
घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पूरक ज्ञान मिळण्यास मदत होते.
दीनदयाळ स्पर्श योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित शैक्षणिक
अभ्यासासोबत ज्ञानवर्धक, सर्जनशील आणि संशोधनाभिमुख छंद जोपासण्याची संधी उपलब्ध करून
देत आहे. योजनेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी संबंधित
सूचनांनुसार निर्धारित परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे तसेच शाळा व पालकांनी
विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी आवश्यक प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन भारतीय डाक विभागाच्या
वतीने करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment