जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांची चौकशी करा- खा. संदिपान भुमरे

 








छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)- प्रत्येक घरी पाणीपुरवठा करणाऱ्या ‘जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये नळाद्वारे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा अपूर्ण कामांची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करा,असे निर्देश खा. संदिपान भुमरे यांनी आज येथे दिले.

            जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडली. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी खा. संदिपान भुमरे हे होते. तर सह अध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विधान परिषद सदस्य सुहास शिरसाट, विधान सभा सदस्य आ.अब्दुल सत्तार, आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके तसेच सर्व लोक प्रतिनिधी सदस्य, विभागप्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

            बैठकीत प्रारंभी मागील बैठकीच्या अनुपालन अहवालावर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत चर्चा झाली.  त्यावेळी महामार्ग या विषयावरील चर्चेसाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल,असे खा. भुमरे यांनी जाहीर केले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचीही जिल्ह्यात योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी निकषांमध्ये व भरपाई देण्यासंदर्भात नियमांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल,असेही खा. भुमरे यांनी सांगितले.त्यानंतर प्रधानमंत्री आवाज योजना शहरी, बायो मायनिंग, बायो मेडीकल वेस्ट, जलजीवन मिशन इ. विषयांवर चर्चा झाली. जलजीवन मिशन योजनेद्वारे झालेल्या कामांबाबत तक्रारी असून गावांमध्ये नळाला पाणी येत नाही, अशा अपुर्ण कामांबाबत चौकशी करावी,असे निर्देश खा. भुमरे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करता यावा यासाठी भारनियमन न करता वीज पुरवठा करावा,असेही निर्देश त्यांनी दिले.

            उर्वरीत विषयांवर शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी ११ वा. बैठक घेण्यात येईल,असे खा. भुमरे यांनी जाहीर केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा