जागतिक एड्स दिनानिमित्त उद्या (दि.१) जनजागृती रॅली

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- जागतिक एड्स दिनानिमित्त शुक्रवार दि.१ डिसेंबर रोजी सकाळी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली  आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वा. क्रांती चौक,छत्रपती  शिवाजी महाराज पुतळा येथून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीस सुरुवात करण्यात येईल.  पैठण गेट, जिल्हा परिषद मार्गे व मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

रॅली दरम्यान जनजागृतीसाठी माहिती पत्रक, कलापथक लोककलाद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जागतिक एड्स दिनाची यंदाची मध्यवर्ती संकल्पना ‘आता नेतृत्व व आघाडी समुदायाची’ ही आहे. या रॅलित महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनी व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अनुदानित अशासकीय संस्थाचा सहभाग असेल. या संपूर्ण सप्ताहात जिल्हास्तरावर जनजागृतीसाठी पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सीएलएचआयव्ही करीता चित्रकला, रांगोळी, कविता, निबंध लेखन स्पर्धा एआरटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे घेण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, शाळेतील शिक्षक व शिक्षिका तसेच रेल्वे स्टाफ व कामगार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरावर संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. रेड रिबन क्लबच्या माध्यमातून विविध जनजागृती स्पर्धा, पथनाट्य,विविध महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार असुन याद्वारे एचआयव्ही एड्स बाबतची मुलभूत माहिती, संसर्ग होण्याची कारणे, लक्षणे, गैरसमज, प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र एकंदरीत आरोग्य विभागाअंतर्गत विविध स्तरावर देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती प्रसार करण्याचा हेतु आहे. जेणे करुन प्रत्येक नागरिकांस या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेल्या सेवांचा लाभ घेता येईल.

तालुकास्तरावरही आयेाजन

तालुकास्तरावरही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१ रोजी सकाळी साडेआठ वा. उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर व प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वैजापूर शहरात रॅलीचे आयेाजन करण्यात आलेले आहे. समारोप ठिकाणी एचाआयव्ही, एड्स जानजागृतीपर पोस्टर्स प्रदर्शन करण्यात येणार आहे. रेड रिबन कल्ब अंतर्गत महाविद्यालयात एचआयव्ही, एड्स जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

या सर्व उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.एम.मोतीपवळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा