विभागीय आढावा बैठकीत मान्यवरांचे मार्गदर्शन :बांबू लागवड पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):-बांबू लागवड ही पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक लाभ होईलच शिवाय पर्यावरणाचे रक्षण होईल,असे मार्गदर्शन आज विभागीय आढावा बैठकीत मान्यवरांनी केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू
व फळबाग लागवड कार्यक्रमाची विभागीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, मनरेगाचे महासंचालक
नंदकुमार, मनरेगा आयुक्त अजय गुल्हाणे, विभागीय आयुक्त मधुकर आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी,वातावरणीय बदल कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे, कोन्बॅक संस्थेचे संचालक
संजीव करपे तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनिकरण, महसूल, सार्वजनिक
बांधकाम, जलसंपदा अशा विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
प्रास्ताविकात प्रविण दराडे यांनी सांगितले की, पर्यावरण संरक्षण
व अनुकूल वातावरणीय बदल अभ्यासून शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी
विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच शासकीय जागा, नदी, नाल्यांच्या काठावर लागवड
करुन जमिनीची धूप थांबविणे, गाळ वाहून जाण्यास प्रतिबंध करणे इ. उपाययोजनांचा समावेश
असेल. प्रोत्साहनासाठी बांबू उत्पादन व त्या उत्पादनाची जागतिक बाजारपेठेतील उलाढाल व त्यात भारताचा हिस्सा याचा अभ्यास करुन
धोरण ठरविणे अशा उपायांचा समावेश आहे.
नंदकुमार यांनी सांगितले की, भूजलाचा प्रश्न सोडविणे, जमिनीचा
पोत सुधारणे, तापमानात घट व पर्जन्यमानात वाढ साध्य करण्यासाठी वैयक्तिक जमिनीवर २०
टक्के हरित आच्छादन असावे. ते फळबाग लागवड, वृक्ष लागवड, कुरण लागवड अशा उपायांमधून
साध्य करावे लागणार आहे. कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवून वायु प्रदूषण थांबविणे
यासाठी या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी बांबू लागवडीला चालना देण्यात येत आहे. त्यातून
शाश्वत आर्थिक उत्पन्न व पर्यावरण संरक्षण असे दोन्ही उद्देश साध्य होतात,असे त्यांनी
स्पष्ट केले.
बांबू लागवड व बांबूच्या विविध उपयोगांबाबत कोनबॅक संस्थेचे
संचालक संजीव करपे यांनी सविस्तर सादरीकरण करुन उपस्थितांना माहिती दिली.
०००००
Comments
Post a Comment