आरोग्य विभागाची वारी, पंढरीच्या दारी: पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा
छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूराला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यांना आरोग्य सेवा-सुविधा पुरविण्यासाठी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम आरोग्य विभागाने सुरु केला आहे. दि.२२ जून ते २८ जुलै पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे. या उपक्रमाद्वारे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना तज्ज्ञ डॉक्टर्स व सुश्रुषा कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्यांसाठी मुख्य कार्यकारी
अधिकारी विकास मिना यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर व
जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ जी.एम.कुडलीकर यांनी हे नियोजन केले आहे. जिल्ह्यातून
जाणाऱ्या दिंड्यांच्या मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य पथकांच्या नियुक्त्या करण्यात
आल्या आहेत. वैद्यकिय अधिकारी, समुदाय
आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यिका व आरोग्य सेविका, आरोग्य
सहाय्यक व आरोग्य सेवक व आशा कार्यकर्ती तसेच
१०२ व १०८ रुग्णवाहिकांचाही या पथकात समावेश आहे.
या सोबतच जिल्ह्यातून जाणाऱ्या पायी दिंड्यांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याचे
नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य
कर्मचाऱ्यांमार्फत नियमित पाणी नमुने तपासणी व ब्लिचींगद्वारे शुध्दिकरण करण्यात
येत आहे. दिंडीमार्गातील सर्व हॉटेल्स् व खानावळी यांचेकडील अन्न व पाणी यांची
तपासणी करण्यात येत आहे.ग्रामपंचायती व
जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत मुक्कामाच्या ठिकाणी व परिसरात धूर फवारणी करण्यात
येत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख मानाच्या
दिंड्यांपैकी संत जनार्दन स्वामी पालखी सोहळा, दौलताबाद
यांच्या दिंडीचे दि. २२ रोजी प्रस्थान झाले असून वारकऱ्यांना आरोग्य
कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य तपासणी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत समुपदेशन करण्यात आले
आहे. तसेच आरोग्य योजनांची माहिती हस्तपुस्तिकेद्वारे वारकऱ्यांना देण्यात येत
असून ठिकठिकाणी बॅनर्स व फ्लेक्स तसेच चित्ररथाच्या माध्यमातुन माहिती दिली जात
आहे. दिंडी मार्गावर सुमारे ५० आरोग्य दुत
नियुक्त करण्यात आले असुन त्यांच्यामार्फत आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात
येत आहेत.पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास आरोग्य सेवा-सुविधा पुरविण्यासाठी नोडल
अधिकारी म्हणुन डॉ सारिका लांडगे यांच्यासह जिल्हा प्रसिध्दी व विस्तार माध्यम
अधिकारी श्रीमती विद्या सानप परिश्रम घेत आहेत.
०००००


Comments
Post a Comment