वाहनांमधून होणाऱ्या संशयित वाहतुकीवर लक्ष ठेवा- विकास मीना

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२९ (जिमाका):- उमेदवारी अर्ज भरण्याचे कामकाज आज पूर्ण होत आहे. आता उमेदवारांच्या प्रचार कार्यासही वेग येईल. त्यातच दिवाळी सारखा सण आहे. त्यामुळे खाजगी, सार्वजनिक वाहनांमधून होणाऱ्या वाहतुकीवर व त्यातील संशयित हालचालींवर लक्ष ठेवा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने  आचारसंहिता  कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांनी सर्व पाहणी पथकांची बैठक घेतली. दुरदृष्य प्रणालीने ही बैठक संपन्न झाली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद  लोखंडे यांची यावेळी उपस्थिती होती.

श्री. मीना यांनी निर्देश दिले की, आचारसंहिता अंमलबजावणीसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथके, फिरती पथके व व्हिडीओ निरीक्षण पथके यांनी आपले काम हे गुणवत्तापूर्ण करावे. त्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांबाबत तपासणी करण्याची दक्षता घ्यावी. रुग्णवाहिका, बॅंकेची वाहने यासारख्या वाहनांचा वापर करुन संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे. तसेच खाजगी वाहतूक बस, सार्वजनिक वाहनांमधून होणारी वाहतुक याकडे लक्ष ठेवावे. कुठे काही संशयास्पद आढळल्यास कारवाई करतांना कागदोपत्री पुरावे जतन करावे. आपल्या कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,असेही विकास मीना यांनी सांगितले.

सी व्हिजील ॲप वर तक्रारी करण्याचे आवाहन

आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत सामान्य नागरिकांना निदर्शनास आलेल्या घटना, हालचालींबाबत आता सी व्हिजील ॲप मार्फत तक्रार करण्यात येऊ शकते. त्याचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा,असे आवाहन विकास मीना यांनी मतदारांना केले आहे.

०००००

 


Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा