निवृत्तीवेतनधारकांनी जीवनप्रमाण दाखला द्यावा;ऑनलाईन सुविधाही उपलब्ध

 छत्रपती संभाजीनगर, दि.२९ (जिमाका):- जिल्हा कोषागाराअंतर्गत सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी येत्या दि.१ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आपला जीवनप्रमाण दाखला संबंधित बॅंकेत प्रत्यक्ष हजर राहून द्यावा.  ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी  http://Jeevanpraman.gov.in या संकेत स्थळावर बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचे ठसे देऊनही जीवनप्रमाण दाखला देण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे सहायक संचालक (निवृत्तीवेतन) श्रीमती सुषमा अ.बुरकुले वरिष्ठ कोषागार कार्यालय,छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्ती वेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची आद्याक्षरनिहाय यादी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बॅंकेस पाठविण्यात आली आहे. निवृत्तीवेतन सुरु ठेवण्याकरीता दि.१ ते ३०नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी प्रत्यक्ष बँकेत हजर राहून यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याच्या ठसा उमटवावा. पुनःर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवावी. तसेच संबंधिताचा आधार नंबर, पॅन नंबर, व मोबाईल नंबर याची नोंद करण्यात यावी.

ज्यांना प्रत्यक्ष बॅंकेत जाणे शक्य नसेल त्यांनी बायोमेट्रीक पद्धतीने जीवन प्रमाण दाखला देण्याकरीता http://Jeevanpraman.gov.in या संकेत स्थळावर दि.१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सुविधा उपलब्ध आहे.

ज्या निवृत्तीवेतनधारकांनी स्वाक्षरी अथवा अंगठा उमटविलेला नसेल अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर २०२४ चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

हयातीचे प्रमाणपत्र बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या समक्ष स्वाक्षरी करुन जिल्हा कोषागारात सादर करता येईल. व जे निवृत्तीवेतनधारक काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदूतामार्फत हयातीचा दाखला जिल्हा कोषागारात सादर करता येईल.  कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येते की, ज्या कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या वयाची ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे पूर्ण केलेली आहेत अशा कुटुंबनिवृत्तावेतनधारकांनी आपले पॅनकार्ड तसेच पॅनकार्ड उपलब्ध नसेल तर जिल्हा शल्य चिकित्सकाचे वयाबाबतचे प्रमाणपत्र ८० वर्षावरील निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी वरिष्ठ कोषागार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दि.१५ डिसेंबर पूर्वी सादर करावे,असे सहायक संचालक (निवृत्तीवेतन) श्रीमती सुषमा अ.बुरकुले वरिष्ठ कोषागार कार्यालय यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा