मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण : अचुक,पारदर्शक प्रक्रिया राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करीता शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आज मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजित या प्रशिक्षणात
त्या त्या विधानसभा क्षेत्रात मतमोजणी कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी आदी सहभागी
झाले होते. जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी
डॉ. अरविंद लोखंडे, टपालीमतपत्रिका नोडल अधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
देवेंद्र कटके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन
केले की, मतमोजणी साठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेच्या आधी मतमोजणी केंद्रावर
उपस्थित रहावे. मतदान यंत्रे स्ट्रॉंगरुम मधून बाहेर आणण्याआधी कुलूप सिल उघडतांना
निवडणूक निरीक्षक, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करणे आवश्यक आहे.
त्यामुळे आवश्यक ती पारदर्शकता जपता येते. मतमोजणी केंद्रावरील संवाद प्रणाली ही अद्यावत
व सुसज्ज ठेवावी. विद्युत पुरवठा अखंड ठेवण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे
पथक सज्ज ठेवावे. मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या तरतूदींचा अभ्यास करा. मतमोजणी
कक्षात शांतता राखायला हवी. टपाली मतपत्रिकांची मोजणीने सुरुवात करा. मतमोजणी केंद्रावर अद्यावत आरोग्य केंद्र सुसज्ज
ठेवा. मतमोजणी केंद्रात केवळ निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनाच मोबाईल
नेता येणार आहे. त्याव्यतिरिक्त कुणालाही मोबाईल नेता येणार नाही. मतमोजणी केंद्राबाहेर
त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्त राहील. १०० मीटर कक्षेच्या आत वाहनांना परवानगी नाही.
याबाबत दक्षता घ्यावी. मतमोजणी प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने राबवावी,असे निर्देश
जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके
व प्रभोदय मुळे यांनीही मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक विधानसभा मतदार
संघात नियुक्त कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीवर प्रशिक्षण सुरु करण्यात आले.
०००००




Comments
Post a Comment