पशुगणनेस प्रारंभ; २५६ प्रगणकांची नेमणूक
छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका)- २१ वा पशुगणना कार्यक्रम दि.२५नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आपल्याकडे पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकास वस्तुनिष्ठ माहिती द्यावी,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभागात दर पाच
वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहिम राबवली जाते. मागील २०
वी पशुगणना २०१९ मध्ये झाली होती. पशुगणनेचा हा कालावधी चार महिन्यांचा असून ग्रामीण
भागात तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची व शहरी भागात चार हजार कुटुंबामागे एक असे जिल्ह्यात एकूण २५६ प्रगणकांची व ४९
पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व प्रगणकांना प्रशिक्षण देऊन
त्यांचे लॉग इन आयडी पासवर्ड तयार करण्यात आले आहेत. पशुगणना ऑन लाईन मोबाईल ॲप
द्वारे करण्यात येणार आहे.
या मोहिमेत गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व,
वराह यांची गणना केली जाणार आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची
अंमलबजावणी करणे, निधीची उपलब्धता करणे सोयीचे ठरणार आहे.त्यानुसार शासनाकडून धोरण
योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात
किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरणासाठी लस व औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे
आपल्याकडील जनावरांची वस्तुनिष्ठ माहिती पशुपालकांनी द्यावी, असे आवाहन जिल्हा
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी केले.
Comments
Post a Comment