मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ साठी बुधवार दि. २० रोजी मतदान होणार आहे. मतदान निर्भय व निष्पक्ष होण्यासाठी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करुन खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे.
मतदान केंद्राच्या
१०० मिटर परिसरात मतदानासाठी नियुक्त कर्मचारी
व मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळता पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र
येणे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात
मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, लाऊड स्पिकर, मेगा फोन, मायक्रोफोन, वायरलेस सेट
वापरणे. मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. मतदान केंद्रातील प्रतिनिधी
वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे. मतदान केंद्र परिसरात शस्त्र बाळगणे, परवानगी
दिलेल्या व्यतिरिक्त वाहनांचा वापर करणे, वाहनांद्वारे मतदारांची ने आण करणे (परवानगी
दिली असल्यास ती वाहनाच्या दर्शनी भागात लावावी), निवडणूक प्रचार करणे, ज्वलनशील स्फोटक
पदार्थ , हत्यारे बाळगणे इ. कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग
झाल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात येईल,असे आदेशात स्पष्ट
करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment